गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यांनतर अनेक स्तरातून शिंदेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि भाजपा त्यांना बाहेरून पाठिंबा देईल असे जाहीर केलं. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे.

‘देवेंद्र फडणवीसांना हिणवणाऱ्यांनो त्याच देवेंद्रजींनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय’. असं ट्वीट करत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील, असं जाहीर केलं आहे. आज संध्याकळी ७.३० च्या सुमारास एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

शिंदेंनी मानले फडणवीसांचे आभार
भाजपाने आम्हाला साथ दिली. संख्याबळ असूनही त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला नाही. तर बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिलं. हा देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. फडणवीस मंत्रीमंडळात नसले तरी आमच्या पाठीशी आहेत. राज्याच्या विकासात ते नेहमी आमच्यासोबत असतील असेही एकनाथ शिंदे म्हणाले.