राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव करत भाजपा उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. महाडिक यांच्या अनपेक्षित विजयानंतर भाजपा गटात जल्लोषाचे वातावरण आहे. या विजयानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ठाकरे यांचे माफिया सरकारचे काउन्ट डाउन, उलटी गिनती सुरु’ असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचे चारही उमेदवार विजयी होतील असा दावा केला होता. मात्र, निकालानंतर त्यांचा हा दावा फोल ठरला. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार यांना प्रबळ उमेदवार मानले जात होते. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही भाजपाने सहाव्या जागेवर आपला उमेदवार धनंजय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणले. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर भाजपाने शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली आहे. आमच्या तिसऱ्या उमेदवाराला संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं मिळाली असा खोचक टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

तर संजय राऊत यांनी सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने जरी सहावी जागा जिंकली तरी त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत महाडिकांचा विजय झाला आहे. मात्र, भाजपाकडून हा मोठा विजय असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार झाला असता तर आम्ही जिंकलो असतो. असो, तरीही त्यांचे अभिनंदन असे राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya criticism of shiv sena after result of rajya sabha election 2022 dpj
First published on: 11-06-2022 at 10:08 IST