अहिल्यानगर : भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) नितीन सुरेश दिनकर यांच्या तक्रारीनुसार श्रीरामपूर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान देसाई यांनी दिनकर यांच्याविरोधात महिलांप्रती गैरवर्तन, पदाचा दुरुपयोग व पोलीस संरक्षणाचा गैरवापर असे गंभीर आरोप करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवत, दिनकर यांचा राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
देसाई यांनी निवेदनात म्हटले की, दिनकर हे महिलांशी गैरवर्तन करतात. दिनकर हे मंत्री राधाकृष्ण विखे यांचे निकटवर्ती आहेत. त्यांच्या राजकीय संबंधामुळे त्यांना पोलीस संरक्षण मिळाले आहे. त्या संरक्षणाचा वापर दबाव तंत्रासाठी केला जात आहे.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष दिनकर यांनी सांगितले की, माझ्या कौटुंबिक कार्यक्रमातील व्हिडिओचा काही भाग संपादित करून तृप्ती देसाई यांनी तो खोट्या दाव्यांसह प्रसारित केला आहे. त्यात माझ्या कुटुंबीयांची, विशेषत: अल्पवयीन नातेवाईक मुलीची बदनामी केली जात आहे. यामागे राजकीय द्वेष आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे.
न्यायालयाच्या परवानगीने पुढील कारवाई
या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की, दिनकर यांच्या तक्रारीवरून तृप्ती देसाई यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई न्यायालयाच्या परवानगीने करण्यात येईल.