scorecardresearch

“…तर आपल्या बाब्याला कार्टं व्हायला वेळ लागणार नाही”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं सूचक विधान!

आज पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये सूचक विधान केलं आहे.

Pankaja Munde pune
पंकजा मुंडे (संग्रहित छायाचित्र)

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे या मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी अनेकदा आपण पक्षात नाराज नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. पण अलीकडेच नाशिक येथे केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं आहे. नाशिकमधील एका सभेत बोलताना ‘आपण कुणासमोर झुकणार नाही’ असं विधान केलं आहे. त्यामुळे त्यांनी हे विधानं नेमकं कुणाला उद्देशून केलं, यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.

नाशिकमधील सभेत केलेलं वक्तव्य ताजं असताना, आज पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा सूचक विधान केलं आहे. “प्रत्येकवेळी आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं… असं म्हटलं तर आपल्या बाब्याला कार्टं व्हायला फार वेळ लागणार नाही, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं. यावेळी त्यांनी आपले वडील आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी किती अपार मेहनत घेतली, याबाबतही वक्तव्य केलं आहे. त्या भारतीय जनता पार्टीच्या बीड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होत्या.

हेही वाचा- सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजुने लागणार?; अशोक चव्हाणांचं सूचक विधान, न्यायाधीशांच्या मतांचा हवाला देत म्हणाले…

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी सात-आठ वर्षांची असेल. त्या काळात फोन नव्हते. मीडिया नव्हता. गोपीनाथ मुंडे एकदा प्रचाराला गेले, तर ते २० ते २२ दिवस पक्षाचा प्रचार करायचे. ते जेव्हा घरी परत यायचे, तेव्हा माझी आई त्यांचे कपडे धुवायची. तेव्हा त्यांच्या (गोपीनाथ मुंडे) कपड्यांमधून प्रचंड माती आणि गाळ निघायचा. एवढी मेहनत गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या पक्षासाठी घेतली.”

हेही वाचा- “भास्कर जाधव कुत्र्यासारखा बेफाम…”, रामदास कदमांची शिवराळ भाषेत टीका!

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “आपला एक स्वभाव असतो. आपण ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं’ असं म्हणतो. आपला माणूस… आपला पक्ष… आणि आपली सत्ता योग्य आहे, हे म्हटलंच पाहिजे. कारण आपण खूप मेहनत आणि पराक्रम करून येथे आलेलो असतो. त्यामुळे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’ म्हणणं कधीतरी ठीक आहे. यामुळे आपल्या बाब्यालाही जरा मूठभर मांस चढतं. पण प्रत्येकवेळी ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’ म्हटलं तर आपल्या बाब्याला कार्टं व्हायला फार वेळ लागणार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 17:10 IST
ताज्या बातम्या