शिवसेनेचं निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. “केंद्र सरकारवर आरोप करण्यापलिकडे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे? त्यांनी जनाधार गमावला, सरकार गमावलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे” असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंना चुकीचे सल्लागार लाभले होते, असे म्हणत विखे पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे.

“वाडवडिलांनी आयुष्यभर कमावलं ते मुलांनी..”, एकनाथ खडसेंनी शिंदे गटासह शिवसेनेलाही सुनावलं!

निवडणूक आयोगाचा निर्णय एकनाथ शिंदेंचा फार मोठा विजय आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा नैतिक पराभव आहे, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, आयोगाच्या निर्णयावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही शिंदे गटासह उद्धव ठाकरेंना सुनावले आहे. “वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावलं, ते एका मिनिटात मुलांनी घालवलं. त्याला कोण जबाबदार आहे कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. पण निवडणूक चिन्ह तात्पुरतं का होईना, गोठवलं जाणं हे क्लेशदायी आहे”, अशी भावना खडसे यांनी व्यक्त केली आहे.

ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास

निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाला पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.