राज्यात काही ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठका घेत आहेत. तसेच मान्सूनपूर्व कामाचा आढावाही त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील पाणी टंचाईचा आढावा घेणारी बैठक घेतली. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये वाद असल्याचं मोठं विधान अनिल परब यांनी केलं आहे.

अनिल परब काय म्हणाले?

“एका बाजूला मुख्यमंत्री सांगत आहेत की, जीवितहानी शून्य असेल. याचा अर्थ त्यांचा मुंबई महापालिकेवर विश्वास आहे. आता जे महानगरपालिकेवर कित्येक दिवसांपासून टीका करत आहेत, एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्वास दाखवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आशिष शेलार अविश्वास दाखवत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये समन्वय नाही असे यावरून दिसते. श्रेयवादाची ही लढाई असू शकते. कदाचित कंत्राटदार आपल्याकडे धावत यावेत, अशा प्रकारचा उद्देशही यामागचा असू शकतो”, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

हेही वाचा : “लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं”; सुनील राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

“गेली कित्येक वर्ष शिवसेना जोपर्यंत सत्तेत होती तोपर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख हे स्वत: मुंबईतील नालेसफाईची पाहणी करायचे. आदित्य ठाकरे यांच्यासह आम्ही जात होतो, पाहत होतो. आजही आम्ही जात आहोत. फक्त आम्ही गाजावाजा करत नाहीत. कारण सत्ता आमच्याकडे नाही, सत्ता त्यांच्याकडे आहे. प्रशासन त्यांचं आहे. प्रशासनावर दबाव आणून ते बाकी सर्व गोष्टी करून घेतात, मग नालेसफाईदेखील करून घेतली पाहिजे. जर पाणी तुंबलं तर त्याला सरकार आणि प्रशासन जबाबदार राहिल”, असं अनिल परब यांनी म्हटलं.

अनिल परब पुढे म्हणाले,”आशिष शेलार म्हणाले की २५ वर्ष मुंबई महापालिका आमच्या (शिवसेनेच्या) ताब्यात होती. आमच्या ताब्यात २५ वर्ष महापालिका होती. पण त्यातील २२ वर्ष ते (भाजपा) देखील आमच्याबरोबर सत्तेत होते. आता हे सर्व सोईच राजकारण सुरू आहे. आशिष शेलार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्येही काहीतरी वाद आहे, असं मला दिसत आहे. त्याच कारण म्हणजे आशिष शेलार आरोप करतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे महानगरपालिकेला क्लिन चीट देतात”, असा दावा अनिल परब यांनी केला.

“मुंबई महापालिका कशा पद्धतीने काम करते. याचे टप्पे आम्हाला माहिती आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा पाहिल्यानंतर ठरवता येईल की नालेसफाई झाली की नाही. मात्र, आम्ही जे पाहतो आहोत त्यावरून तरी समाधानकारक काम झालेलं नाही”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

…तर सर्वजण हजर राहिले असते

मराठवाड्यात दृष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात आढावा बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीला मराठवाड्यातील पाच पालकमंत्र्यांपैकी फक्त दोन मंत्री बैठकीला उपस्थित राहिले. तीन पालकमंत्री बैठकीला गैरहजर राहिले होते. यावर बोलताना अनिल परब म्हणाले, “ती बैठक दुष्काळाची होती. जर टेंडर काढायची बैठक असती तर सर्वजण हजर राहिले असते. निवडणुक संपली. त्यामुळे लोक दुष्काळात होरपळले काय आणि लोकांना पाणी मिळतं की नाही? याच्याशी त्यांना काही देणेघेणं नाही”, अशी खोचक टीका अनिल परब यांनी केली.

Story img Loader