Raosaheb Danve On Arjun Khotkar : विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात अनेक नेत्यांचे दौरे सुरु असून मतदारसंघाची आणि उमेदवारांची चाचपणी या माध्यमातून करण्यात येत आहे. यातच महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपाबाबत खलबतं सुरु आहेत. मात्र, विधानसभेच्या काही मतदारसंघावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यातच भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेना (शिंदे) नेते अर्जुन खोतकर यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यामध्ये बोलताना माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. “मी चांगल्या चांगल्यांचे मुडदे पाडले आहेत. कच्च्या गोट्या खेळलेलो नाही”, असं रावसाहेब दानवे म्हणाले. त्यानंतर प्रत्युत्तर देताना अर्जुन खोतकरांनीही आज तुम्ही जात्यात आहात तर आम्ही सुपात, उद्या आम्ही जात्यात असू तुम्ही जात्यात याल, असं सूचक विधान करत रावसाहेब दानवे यांना इशारा दिला.

हेही वाचा : Amol Kolhe : अमोल कोल्हेंचं जयंत पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं सर्वोच्च पद…”

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

“आम्ही महायुतीमधील माणसं आहोत. आम्ही बेईमानी करणार नाहीत. आता काही माणसं असं म्हणत आहेत की रावसाहेब दानवेंचा पराभव हा आमच्यामुळे झाला. पण मी सांगतो रावसाहेब दानवे हा माणूस कच्च्या गोट्या खेळलेला नाही. मी चांगल्या चांगल्यांचे मुडदे पाडलेत”, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या (शिंदे) अर्जुन खोतकरांवर टीका केली.

अर्जुन खोतकर काय म्हणाले?

“कोणी कोणाला भिती दाखवण्याची गरजच नाही. निवडणुका कायम येत राहतात. आज तुम्ही जात्यात आहात तर आम्ही सुपात, उद्या आम्ही जात्यात असू तर तुम्ही जात्यात याल. त्यामुळे अशा प्रकारचं चक्र सुरुच राहत असतं”, असं प्रत्युत्तर अर्जुन खोतकर यांनीही नाव न घेता रावसाहेब दानवे यांना दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एकीकडे विधानसभेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार असल्याचे वरिष्ठ नेते सांगतात. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरु असल्यामुळे महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. यातच रावसाहेब दानवे यांनी केलेले विधान चर्चेत आले असून जालन्यात महायुतीमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.