मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएसकडून विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. इसिसशी संबंधित लोकांना शोधलं जात आहे. एनआयए आणि एटीएसकडून अटक केलेल्या आरोपींकडून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. दरम्यान, आरएसएस आणि भाजपाच्या मोठ्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येणार होतं, अशी माहिती तपासातून समोर आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणावर भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
माझ्या गाडीचाही अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझा जीव जाता जाता वाचला, अशी खळबळजनक माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे इतर काही नेते शत्रूंच्या टार्गेटवर आहेतच. पण आम्हालाही धमक्या मिळतात. तथापि आम्हाला धमकी मिळाल्यानंतर आम्ही प्रसारमाध्यमांसमोर येऊन सांगत नाही. धमकीबाबतची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली पाहिजे, असाच आमचा प्रयत्न असतो. अलीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर समजलं की आरोपी तुरुंगातून धमकी देत होता. भाजपाच्या अनेक नेत्यांना धमकी दिली जाते. पण आम्ही प्रसारमाध्यमांपर्यंत या गोष्टी कधी पोहोचवत नाही.”
हेही वाचा- “नितीन देसाईंना अनेकांनी ब्लॅकमेल केलं”, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?
“माझ्याही गाडीचे नट-बोल्ट सैल केले होते. माझ्या गाडीचा अपघात होता होता वाचला होता. माझा जीव जाता जाता वाचला आहे. पण मी कोणतीही पत्रकार परिषद घेऊन याबाबत बोललो नाही. विधानसभेतही मी यावर काही बोललो नाही. माझं फक्त पोलीस विभागाशी बोलणं झालं होतं. एटीएसनेही अनेक मंत्र्यांना सांगितलंय की, तुम्ही तुमच्या लोकांना सावध करा. कारण काही विदेशी शत्रू तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा मित्र, निकटवर्तीय किंवा कार्यालयातील कर्मचारी यांचा वापर करतात. त्यांना काही क्लिप पाठवल्या जातात, संबंधित क्लिप डाऊनलोड करायला सांगितलं जातं, त्यानंतर संबंधित मोबाईल तुमच्या आसपास असला तरी तुमची प्रत्येक गोष्ट पाकिस्तानपर्यंत पोहोचते. त्यामुळे अनेक लोकांना सावधान केलं आहे” अशी खळबळजनक माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.