Suresh Dhas : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. सध्या सर्वच पक्षांकडून निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांच्या नेत्यांच्याही सभांचा धडाका राज्यात पाहायला मिळत आहे. या विधानसभेची ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. महाराष्ट्राच्या या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच ऐन निवडणुकीत महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
भारतीय जनता पक्षाचने नेते तथा आष्टी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या एका विधानामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्या पक्षाच्या घड्याळाचे आधीच १२ वाजलेत. लोकांची भावना ही तुतारीकडे असल्याचं विधान एका प्रचाराच्या सभेत सुरेश धस यांनी केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे.
सुरेश धस काय म्हणाले?
“पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत. घड्याळाकडे कुठे लोकांची भावना आहे? लोकांची भावना तुतारीकडे होती. मोठ्या पवारांकडे (शरद पवार) लोकांची भावना आहे, छोट्या पवारांकडे (अजित पवार)लोकांची भावना नाही. पहिलेच नकारात्मकता आहे आणि तुम्हाला एक सांगतो, नकारात्मकता असताना तुम्ही त्यांचं तिकीट एवढ्या जोरात लोकांना दाखवता. मग नेमकं चाललंय काय? दाल मे कुछ तो काला है ना? मग घडाळाचं चिन्ह आष्टी विधानसभा मतदारसंघात का दिलं गेलं? फक्त कमळाला रोखण्यासाठी? कमळाची मते कमी करण्यासाठी का?”, असे सवाल सुरेश धस यांनी अजित पवारांना केले आहेत.
महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना लवकरच तुतारीच्या प्रचाराची जबाबदारी मिळणार सुत्रांची माहिती #
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 6, 2024
‘सुरेश धस लवकरच तुतारीचा प्रचार करणार’
भारतीय जनता पक्षाचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या घड्याळाचे बारा वाजलेत असं सुरेश धस यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. “महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना लवकरच तुतारीच्या प्रचाराची जबाबदारी मिळणार सूत्रांची माहिती”, असं अमोल मिटकरी यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.