भाजपात महिलांचा सन्मान होत नसल्याच्या मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मंदा म्हात्रे यांच्या नाराजीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manda Mhatre Chandrakant Patil BJP
मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया (Photo : File)

भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप करत भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच एका कार्यक्रमात मंदा म्हात्रे यांनी आपली ही खंत बोलून दाखवली आहे. स्वतःचं कर्तृत्त्व सिद्ध करून सुद्धा पक्षाकडून डावललं जातं, अशा शब्दात मंदा म्हात्रे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मंदा म्हात्रे यांच्या या नाराजीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागलेल्या असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंदा म्हात्रे यांच्या नाराजीवर चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले कि, “मंदा म्हात्रे यांचं काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेऊ.” चंद्रकांत पाटील हे आज (४ सप्टेंबर) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, भाजपाबाबत नाराजी व्यक्त करताना मंदा म्हात्रे म्हणाल्या कि,”महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, माझं कर्तृत्त्व होतं. पण महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे अनेक प्रकार होतात.”

मी कोणालाही घाबरत नाही!

मंदा म्हात्रे यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या कि, “मी कोणालाही घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्ष असतात ना आपल्याला साथ द्यायला.” राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, अशी खंतसुद्धा मंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. मात्र, “आपण कधीही स्वतःला कमी समजू नये”, असा सल्ला देखील यावेळी मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.

विश्वासघातक्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही!

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेनेवर देखील शाब्दिक हल्ला चढवला आहे. “भाजपची ताकद आता वाढली असून भाजपा मित्रपक्षांना सोबत घेऊन यापुढे सर्व निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढवेल. पण ज्यांनी मोदींच्या नावावर मतं मागितली आणि आमचा विश्वासात केला अशा विश्वासघातक्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. त्याचसोबत, “आमच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवून आणि जिंकून दाखवू”, असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मनसे-भाजप युतीच्या चर्चांवर भाष्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट आणि मनसे-भाजप युतीच्या चर्चांवर देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, “मनसेसोबत युतीचा कोणताही विषय झालेला नाही. नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत अचानक भेट झाली होती.”

खडसेंबद्दल बोलण्यास नकार

“सीबीआयचं काम सीबीआयला करू द्या”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणावर भाष्य केलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि जावयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावर काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp maharashtra chandrakant patil reaction on manda mhatre allegations gst