राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टीने केलीय. महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आव्हाड यांच्या भाषणाचा ५१ सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. ‘जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध, माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही, असं आव्हाड म्हणालेत,’ असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचं म्हणणं काय?
“ओबीसी समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का?”, असा प्रश्नही भाजपाने उपस्थित केलाय. तसेच “राष्ट्रवादीच्या मनात ओबीसी समाजाबद्दल एवढा राग का?, यासाठीच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवंल का?,” असा प्रश्नही भाजपाने विचारलाय. या ट्विटमध्ये आव्हाड आणि राष्ट्रवादीची अधिकृत ट्विटर हॅण्डल टॅग करत त्यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय.

व्हिडीओत काय म्हणाताना दिसतायत आव्हाड?
“ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,” असं आव्हाड या व्हिडीओत म्हणता दिसत आहेत.

नक्की वाचा >> ओबीसींवर माझा फार विश्वास नाही म्हणणारे आव्हाड म्हणजे…; गोपीचंद पडळकरांनी साधला निशाणा

ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पगडा
“ओबीसींवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,” असं आव्हाड म्हणाले आहेत.

हा व्हिडीओ सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पोस्ट करण्यात आला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp maharashtra says minister jitendra awhad insulted obc community tweeted a video scsg
First published on: 04-01-2022 at 10:10 IST