आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने पूर्वतयारीला सुरुवात केली असून कल्याण डोंबिवलीत भाजपाला मोठा धक्का दिला. नगरविकासमंत्री व शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांनी २२ नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश केला. भाजपाचे डोंबिवलीमधील महेश पाटील, सायली विचारे आणि सुनीता पाटील यांनी हातावर शिवबंधन बंधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदेदेखील यावेळी उपस्थित होते.

दरम्यान या पक्षप्रवेशामधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पक्षप्रवेशादरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना महेश पाटील यांनी चुकून भाजपात प्रवेश करत असल्याचं म्हटलं आणि एकनाथ शिंदेंसह उपस्थितांना हसू आवरेनासं झालं.

महेश पाटील नेमकं काय म्हणाले –

“श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जी विकासकामं सुरु आहेत, तसंच एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे भारावून जाऊन मी स्वत: आणि माझे अनेक सहकारी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे,” असं महेश पाटील यावेळी म्हणाले. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी त्यांना शिवसेना अशी आठवण करुन दिली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महेश पाटील यांनी नंतर चूक सुधारत माफ करा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे म्हटलं. मात्र यावेळी महेश पाटील यांनाही हसू आवरत नव्हतं. सवय सुटत नाही सांगत तेदेखील हसत होते. तर त्यांच्या मागे बसलेले एकनाथ शिंदेदेखील हसत होते.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं आवाहन केले. तसंच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पक्षात आलेले कार्यकर्ते सर्वस्व पणाला लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाच्या माजी तीन नगरसेवकांसोबतच माजी परिवहन समिती सदस्य संजय राणे, मनसे पदाधिकारी सुभाष पाटील, रवी म्हात्रे, विजय बाकोडे, सुजित नलावडे, पंढरीनाथ म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, राजाराम म्हात्रे, देवा माने, मोहन पुंडलिक म्हात्रे, हनुमंत ठोंबरे, विक्की हिंगे, उज्ज्वला काळोखे आणि इतर कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.