मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मुंबईतील याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण झाल्याचा मुद्दा चर्चिला जात आहे. यावरून भाजपा-शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच, भाजपाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. त्यात आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत, काही सवाल उपस्थित केले आहेत.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं की, “तत्कालीन मुख्यमंत्री जनाब उध्दव ठाकरे यांच्या विशेष कृपा प्रसादाचे मानकरी दाऊद टोळीचे मालमत्ता प्रमुख नवाब मलिक यांनीच याकूबच्या कबरीचे प्रकरण दडपले होते. उध्दव ठाकरे हे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का होते? वक्फ बोर्डाकडे तक्रार झाल्यानंतरही सरकार अळीमिळी करून का बसले?,” असा प्रश्न भातखळकर यांनी विचारला आहे.

“तरीही शाहजादे आमच्याकडे बोट…”

तर, ‘२०१५ मध्ये एवढा मानसन्मान एका अतिरेक्याला दिला का? महापालिकेचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही,’ असे प्रत्युत्तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपाला दिलं होते. त्यावर, “जनाब सेनेचा कांगावा उघड झालाय. २०२० मध्ये टायगर मेमनने कब्रस्तानच्या ट्रस्टीला धमकावले होते. परंतु, दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला’ यांचे जावई असल्यामुळे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. नंतर कबर सजवण्यात आली. तरीही शाहजादे आमच्याकडे बोट दाखवतायत,” असा निशाणा अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता ट्विट करत साधला आहे.

काय आहे वाद?

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते. हा वाद समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या कबरीवरील एलईडी लाईट्स हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.