“एसटी संप मिटविण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे आणि संपामध्ये वाढ झाली पाहिजे असा सुनियोजित कट पद्धतशीपरणे महाविकास आघाडी सरकारकडून रचला जात आहे.” असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू व्हा, असं एका बाजूला आवाहन करायचं आणि तो कर्मचारी जेव्हा कामावर रुजू होतोय. तेव्हा त्याच्या हातात नोटीस द्यायची. ५० लाख रुपयांचं नुकसान झालं, एक-दोन कोटींचं नुकसान झालय, अशा पद्धतीच्या नोटीसा त्याला द्यायच्या. म्हणजे एकीकडे एका बाजूला कर्मचाऱ्याला कामावर हजर राहण्याचं आवाहन करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या हातात नोटीसा द्यायच्या.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, “आता एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या बाबतीत समितीने अहवाल सरकारकडे दिला. परंतु सरकार परत आठवड्याची मूदत मागत आहे. म्हणजेच सरकारला हा संप कसा चिघळतोय आणि आपल्याला त्यामध्ये कशी नवीन भरती काढता येईल, आहे त्या कर्मचाऱ्याला काढून टाकायचं आणि नवीन कर्माचाऱ्यांची भरती करायची. म्हणजे त्यामध्ये आपल्याला टक्केवारी घेता येईल, मोठा घोटाळा करता येईल. दुसऱ्या खात्यात जसा नोकर भरतीचा घोटाळा झाला तशा पद्धतीने एसटीच्या भरतीत मोठा घोटाळा करायचा कट सरकारचा यामधून दिसतोय.” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.