मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारला पाहिजे आणि आपला अधिकार हिसकावून घेण्याचा पण केला पाहिजे असं आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या लेखकांनी होळकरशाहीचा दैदीप्यमान इतिहास पुसण्याची मोहीम चालवली असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाबेह आंदोलनदेखील केलं.

“पानीपतमधील पराभवानंतर हिंदवी स्वराज्याचा भगवा पताका थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांनी खांद्यावर पेलला. पानीपतच्या पराभवाचं रुपांतर प्रभावात केलं. मुघलशाहीला टाचेखाली चिरडलं. ‘मल्हार आया भागो’ म्हणत मुघल सैनिकांची भांबेरी उडायची. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची ताकद अटकपासून कटकपर्यंत पसरवली अशा सुभेदार मल्हाराव होळकर यांची आज जयंती आहे,” असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

“प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या लेखकांनी होळकरशाहीचा दैदीप्यामान इतिहास पुसण्याची मोहीम चालवली. हे तर तुम्ही मल्हारराव होळकर यांनी बांधलेला आणि यशवंतराव होळकर यांचा जन्म झालेल्या वापगाव किल्ल्यावरुन ओळखलचं आहे. हा संघर्षाचा, पराक्रमाचा इतिहास बहुजनांच्या समोर आला, कळाला तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ. आम्ही आमचा राजकीय हक्क मागू हे काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाही आहे,” असा आरोप पडळकरांनी केला.

“बहुजनांनी यांना मुजरा करत दादा, भाऊ, काका, साहेब, युवराज म्हणायचं म्हणजे जास्तीत जास्त जिल्हा पंचायत आणि पंचायत समितींवर बोळवण होईल हा डाव आपण ओळखला पाहिजे,” असंही पडळकर म्हणाले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारला पाहिजे. आपला अधिकार हिसकावून घेण्याचा पण केला पाहिजे. ओबीसी आरक्षणाचं कोणी पानीपत करणार असेल तर आपण एकत्र लढूया आणि जिंकूया,” असंही ते म्हणाले.