गेल्या दोन दिवसांपासून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राष्ट्रपती राजवट कुणी लावली? यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांबाबत गंभीर आरोप केल्यानंतर त्यापाठोपाठ शरद पवारांनीही पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, असं विधान केलं. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षात नेमकं काय घडलं होतं? यावर अजूनही चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

भाजपाने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शरद पवारांवर टीका केली आहे. भाजपा नेते राम कदम यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनीच शिवसेना फोडल्याचं विधान केलं होतं. “संजय राऊत सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला पहिल्यांदा कोणी फोडण्याचा प्रयत्न केला आणि कोणी शिवसेना फोडली यावरही बोलावं. या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं. आजतागायत छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे यावरही संजय राऊतांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे”, असं विधान राम कदम यांनी केलं होतं. त्यावरून चर्चेची राळ उठली असतानाच गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून ट्वीट केलं आहे.

“पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…” शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

गोपीचंद पडळकरांनी आज सकाळी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट केलं आहे. यात उद्धव ठाकरेंना उद्देशून सल्ला देतानाच त्यांनी ‘शकुनी काका’ असाही उल्लेख केला आहे. “उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल!” असं गोपीचंद पडळकर या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यामुळे आता या ट्वीटवरून पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.