राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा मंगळवारी (१२ डिसेंबर) नागपूर येथे समारोप झाला. यानंतर रोहित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही समर्थकांनी विधानभवन परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी लाठीमार करत रोहित पवारांसह काही समर्थकांना काही वेळासाठी ताब्यात घेतलं. या संपूर्ण प्रकरणावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. त्याला ज्यांनी युवा संघर्ष यात्रा काढण्याचा सल्ला दिला, तेही बेअक्कल माणसं आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली. सोन्याच्या बाळुत्यात जन्मलेल्या रोहित पवारांनी संघर्ष कधी बघितला? असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेबाबत विचारलं असता गोपीचंद पडळकर म्हणाले, “खरंतर, रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. त्याला ज्यांनी ही यात्रा काढण्याचा सल्ला दिला असेल, ती बेअक्कल माणसं आहेत. अरे संघर्षाचा आणि रोहित पवारांचा संबंध काय आहे? रोहित पवारांनी जन्म झाल्यापासून कधी संघर्ष बघितलाय का? मुळात त्यांची ही संघर्ष यात्रा सपशेल अपयशी झाली आहे. राज्यभर कुणीच प्रतिसाद दिलेला नाही.”

हेही वाचा- “शाहू, फुले, आंबेडकर आम्हाला कुणी शिकवू नये, रोहित पवारांचा फ्लॉप शो..”, अमोल मिटकरींचे टोमणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रोहित पवारांच्या हातात कुठलाही विषय नाही. मग शेवटी काय करायचं म्हणून त्यांनी पोलिसांशी वाद घातला. आम्ही आता विधानभवनावर जातो. आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, असं म्हणायचं. मग म्हणायचं सरकारने पोलीस बळाचा वापर केला. त्यांची ही यात्रा पूर्णपणे अपयशी झाल्यामुळे काहीतरी स्टंट करायचा म्हणून त्यांनी कालचा प्रकार केला. त्या प्रकाराकडे महाराष्ट्रातील माणसं गांभीर्याने बघत नाहीत,” असा टोलाही पडळकरांनी लगावला.