गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्यामुळ हा प्रश्न अजूनच चिघळला आहे. एकीकडे न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेलेल असताना दुसरीकडे राज्य सरकारने ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केलं आहे. तसेच, राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार असल्याचं देखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितल्यानंतर त्यावरून आता भाजपानं टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्यावरून अनिल परब यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

“ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघड”

या कृतीमधून ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. “मराठी एस.टी कर्मचाऱ्यांविषयी त्यांना कुठलीही आपुलकी नाही, हे त्यांच्या कृत्यातून सिद्ध झाले आहे.
एखादा व्यक्ती जेव्हा हतबलतेमुळे आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलतो त्यावेळेस त्याच्यावर बिकट परिस्थिती असते. अशा वेळेस त्याला धीर देऊन आत्महत्येच्या विचारातून बाहेर काढायचं असतं. पण यांनी कालपासून एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, अवमान याचिका दाखल करण्याची मिडीयाद्वारे धमकी देणे असे प्रकार सुरू केले आहेत”, असं पडळकर म्हणाले.

…तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची

दरम्यान, राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे कोणत्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असं देखील पडळकर म्हणाले आहेत. “जागोजागी व गावोगावी पोलिसबळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखलं जात आहे. यावरून सिद्ध होते की शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचाय. जेणेकरून पोलिसांच्या लाठ्या -काठ्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल. यांच्या निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्याने हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील”, असं पडळकर म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करायचे की तुमच्या सुखा-दु:खात साथ देणाऱ्या लालपरीचे कर्मचारी आज आत्महत्येच्या दारात आहेत. आज त्यांना तुमच्या मदतीची, धीराची, आपुलकीची गरज आहे. कारण एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल”, असेही पडळकर महणाले.