कराड : कराड उत्तर विधानसभा मतदार संघात दीर्घकाळाने परिवर्तन झाल्यानंतर भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी जनसंपर्क आणि लोकांची कामे मार्गी लावण्याचा धडाकाच लावला आहे. सहा महिन्यांत तब्बल १३ जनता दरबार घेत लोकांचे हजारो प्रश्न निकाली काढण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळणारे आमदार म्हणून आमदार मनोज घोरपडे यांच्याकडे पाहिले जाते. कराड उत्तर मतदारसंघात ठिकठिकाणी त्यांनी दर पंधरा दिवसाला जनता दरबार आयोजिला आहे. गेल्या सहा महिन्यांत मतदारसंघातील कराड, कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यात एकूण १३ जनता दरबार आयोजित केले आहेत. सामान्य नागरिकांना शासनाच्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. या विशेष कार्याबद्दल मतदारसंघातील सामान्य नागरिक आमदार घोरपडे यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

नुकत्याच झालेल्या कराड तालुक्यातील कोपर्डे हवेलीच्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात ग्रामस्थांचे अनेक प्रश्न सुटले. या वेळी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाल्याचे दिसून आले. जनता दरबारात महसूल, अभिलेख, वन विभाग सहकार, महावितरण, कृषी विभाग, ग्राम विकास, पशुसंवर्धन, पोलीस ठाणे आदी विभागांबाबतची प्रलंबित कामे, तक्रारींवर आमदार घोरपडे यांनी त्वरित कार्यवाही केली. नायब तहसीलदार बी. के. राठोड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पहिलवान संतोष वेताळ, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, महेश जाधव, तुकाराम नलावडे, अमोल पवार, महेश चव्हाण, प्रकाश पवार, शैलेश चव्हाण, राहुल पाटील, सुभाष चव्हाण, राजन पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना सूचना

आमदार मनोज घोरपडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या अडचणी सोडण्यासंदर्भात रास्त सूचना या वेळी केल्या. विशेषतः कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यातील हा तेरावा जनता दरबार होता. गेल्या दोन जनता दरबारातील काही प्रश्न प्रलंबित असल्याचे नागरिकांनी सुचित केल्यानंतर आमदार घोरपडे यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत हे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याच्या स्पष्ट सूचना केल्या.