गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. ही भेट युतीसंदर्भात असू शकते, अशीही चर्चा आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या मुंबई दौऱ्यात कुणाला भेटतील? याबाबत मी आताच काही सांगू शकत नाही. अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर येताना, ते कुणाला भेटतील, ते कुठे जातील? हा निर्णय तेच घेतात. हा त्यांनी ठरवलेला कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम कसा असेल, हे आम्हाला अद्याप माहीत नाही. पण त्यांनी निश्चितपणे काही कार्यक्रम ठरवले असतील, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते चंद्रपुरात एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

हेही वाचा- काँग्रेसचेही नऊ आमदार फुटणार? प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण आत्ता…!”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध भाजपा नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याप्रकरणी विचारलं असता बावनकुळे म्हणाले की, “राज ठाकरे यांच्याशी आमचे कौटुंबीक संबंध आहेत. त्यामुळे एक मित्र म्हणून आम्ही त्यांना भेटायला जातो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या राजकीय चर्चेसाठी जात नाही. युती करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. ते अधिकार केंद्रातील नेतृत्वाला आहेत. सध्या राज्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात मनसेशी युती होणार की नाही? याबाबत आताच मत व्यक्त करणं योग्य नाही. संघटना, पक्ष मजबूत करण्याचं उद्दिष्टं सध्या आमच्यासमोर आहे. त्यासाठी आम्ही आमची तयारी नेहमी करत असतो.”

हेही वाचा- “तो VIDEO पाहून मला आजही…” मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केलेल्या वृद्ध महिलेची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेशी युती करण्यास आशिष शेलारांचा विरोध आहे का? असं विचारलं असता बावनकुळे म्हणाले, हे केवळ माध्यमांना माहीत आहे, बाकी आमची याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आपण सर्वांनी मित्रत्वाच्या नात्याने महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. याच कारणातून मी राज ठाकरेंना भेटायला गेलो. काल एकनाथ शिंदेही याच कारणातून भेटायला गेले. शेवटी मित्रत्व महत्त्वाचं आहे. राजकारणासाठी एकमेकांचे कपडे फाडण्यापेक्षा मित्रत्वाची भावना टिकली पाहिजे. राजकारण हे केवळ निवडणुकीच्या काळात असलं पाहिजे, या भावनेतून आम्ही कार्य करत असतो, असंही ते यावेळी म्हणाले.