नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस अद्याप बराच अवधी आहे. पण त्याच्या वातावरण निर्मितीसाठी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना आजच केंद्रीय गृहमंत्र्यांसह पक्षाच्या अन्य नेत्यांना बोलावण्याची वेळ आली. यावरून त्यांचा आत्मविश्वास ढासळला असल्याचे दिसते, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी रविवारी येथे दिले. जिल्ह्यातील काँग्रेसच्या माजी आमदारांपैकी कोणीही पक्षांतर करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि भाजपाच्या अन्य नेत्यांच्या नांदेड दौऱ्याची माहिती देण्यासाठी शनिवारी येथे घेतलेल्या वार्ताहर बैठकीत अशोक चव्हाण यांनी स्थानिक काँग्रेसवर टीका केली होती. जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष कमकुवत झाला असून, पक्षाच्या तिरंगा फेरीसाठी प्रदेशाध्यक्षांना नांदेडला यावे लागत आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या वार्ताहर बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनीही समाचार घेतला.
खासदार चव्हाण-बेटमोगरेकर म्हणाले की, भाजपाने नांदेडमध्ये केवळ तिरंगा फेरी काढली. आम्ही येत्या २८ तारखेला ‘जय जवान जय किसान’ फेरीचे आयोजन करून भारतीय सैन्यासह सैन्याच्या शौर्याला सलाम करणार आहोत. तसेच शेतकऱ्यांबद्दल आस्थाही व्यक्त करणार आहोत. ही फेरी नवा मोंढ्यातील काँग्रेस कार्यालयापासून निघून जिल्हाधिकारी कचेरीपर्यंत जाईल. यात पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसह ट्रॅक्टरधारी शेतकरी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी होणाऱ्या जाहीर सभेत काँग्रेसचे काही माजी आमदार प्रवेश करणार असल्याची अफवा भाजपाकडून पसरविली जात आहे. पण नांदेड जिल्ह्यातील ईश्वरराव भोसीकर, माधवराव पाटील जवळगावकर आणि मी स्वतः यापैकी कोणीही भाजपामध्ये जाणार नसल्याचे बेटमोगरेकर यांनी स्पष्ट केले. सध्या भाजपा व इतर पक्षांमध्ये पक्षप्रवेश सोहळे होत आहेत. पण पुढील काळ काँग्रेसचाच आहे, असा दावा वार्ताहर बैठकीत करण्यात आला. यावेळी महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, श्याम दरक, एकनाथ मोरे, मुन्ना अब्बास, सुरेन्द्र घोडजकर, प्रवक्ते मुन्तजीब, आनंदा गुंडले आदी नेते हजर होते.