नांदेड : १९५१-५२च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते आतापर्यंतच्या ७३ वर्षांमधील काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात दिवंगत शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पिता-पुत्रांस तब्बल ६० वर्षे स्थानिक ते राज्य-केंद्रीय सत्तेत स्थान मिळाले, तरी या पक्षात आपल्याला १४ वर्षे वनवास भोगावा लागल्याचा साक्षात्कार खा.अशोक चव्हाण यांना आता झाला असून त्यांनी आपल्या मनातील खदखद काँग्रेस नेते (कै.) विलासराव देशमुख यांच्या भूमीमध्ये रविवारी व्यक्त केली.
दीड वर्षांपूर्वी भाजपावासी झालेल्या चव्हाण यांना या पक्षाने तात्काळ राज्यसभेवर घेतले; पण पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने ते अस्वस्थ असल्याचे त्यांच्या देहबोलीतून दिसत असताना लातूर येथे भाजपाच्या व्यासपीठावरून बोलताना चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातील आपल्या २०१० ते २०२४ या कालखंडास वनवास संबोधल्यानंतर त्यांच्या कर्मभूमीतूनच चव्हाण पिता-पुत्राच्या ६० वर्षांच्या सत्ताकाळाचा हिशेब अर्थशास्त्राच्या एका संशोधक विद्यार्थ्याने सोमवारी मांडला.
शंकररावांची राजकीय कारकीर्द १९५१च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून सुरू झाली. विधानसभेला हदगाव मतदारसंघातून पराभूत झालेले शंकरराव व्यथीत मनाने वकिली करण्यासाठी हैदराबादला निघाले होते. पण त्यावेळच्या काही जाणत्या नेत्यांनी त्यांना थांबविले. मग शंकरराव १९५२ साली नांदेडचे नगराध्यक्ष झाले. तेथून १९८० पर्यंतच्या २८ वर्षांत वसंतदादा पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाचा वर्ष-सव्वा वर्षाचा काळ वगळता शंकररावांना उपमंत्रिपदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत बढती आणि संधी काँग्रेसकडूनच मिळाली.
शंकररावांच्या सत्ता काळातच अशोक यांचे राजकीय पदार्पण थेट काँग्रेसच्या खासदारकीने झाले. १९८७ ते २०२४ या ३७ वर्षांत काँग्रेस पक्ष राज्यामध्ये ११ वर्षे सत्तेत नव्हता. उर्वरित २६ वर्षांतील सुधाकर नाईक आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण नव्हते. त्यांना १५ वर्षांहून अधिक काळ सत्तेत मुख्यमंत्री पदासह सारे काही मिळाले, तरी त्यांनी काँग्रेसमध्ये आपल्याला वनवास भोगावा लागल्याचे म्हटल्यानंतर नांदेडच्याच संदीपकुमार बारडकर यांनी त्यांचा समाजमाध्यमांतून समाचार घेतला आहे.
काँग्रेसच्या सत्ताकाळात इंदिरा गांधी यांच्यापासून ते राजीव-सोनिया गांधीपर्यंतच्या पक्षाध्यक्षांनी शंकररावांच्या ज्येष्ठतेचा मान राखत त्यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची पदे दिली. त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनाही काँग्रेस श्रेष्ठींनी दोनदा मुख्यमंत्री केले. २०१० साली त्यांना ‘आदर्श’ प्रकरणात मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्याचे खापर आता त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर फोडले आहे; पण त्यानंतर काँग्रेस पक्षाने २०१४ साली चव्हाण यांना खासदार तर त्यांच्या पत्नीला आमदार केले, मग त्यांना ४ वर्षे प्रदेशाध्यक्षपद दिले गेले.
प्रदेशाध्यक्षपदावर असताना त्यांना आपली खासदारकी टिकवता आली नाही. पुढे २०१९ ते २०२२ दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसने इतर नेत्यांसोबत चव्हाण यांनाही मंत्री केले. असे असताना, चव्हाण यांनी वरील कालखंडाचे वर्णन ‘वनवास’ केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील अनेक काँग्रेसजन चकित झाले आहेत. चव्हाणांच्या वरील वक्तव्यावर स्थानिक नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया नोंदवली नाही. पण संदीपकुमार देशमुख यांनी ७३ वर्षांपैकी ६० वर्षे चव्हाण पिता-पुत्र सत्तेत किंवा काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या स्थानांवरच होते, याकडे लक्ष वेधले आहे.
भाजपाने गळ घालून चव्हाण यांना आपल्याकडे ओढले; पण…
दुधामध्ये दाणेदार साखर मिसळून दोन्ही घटक एकजीव व्हावेत, तसे चव्हाण यांनी आपण भाजपात आता एकरुप झालो आहोत, हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात भाजपामध्ये जाण्यासाठी त्यांनीच मोदी-शहा व फडणवीस यांची भेट घेतली होती, हे लातूर येथे सांगून टाकले. आतापर्यंत सार्यांचा समज असा होता की, भाजपाने गळ घालून चव्हाण यांना आपल्याकडे ओढले; पण वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे दिसत आहे.