scorecardresearch

आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेल्या आव्हानावर सुजय विखे म्हणाले, “आव्हान देणाऱ्यांच्या पिताश्रींनी…”

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं. यावर आता भाजपा खासदार सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिलं.

Sujay Vikhe Eknath Shinde Uddhav Thackeray Aaditya Thackeray
सुजय विखे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“मी वरळीतून राजीनामा देतो. माझ्याविरोधात निवडणूक लढवा. तुम्ही कसे निवडून येतात ते मी बघतो,” असं थेट आव्हान शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. यावर आता भाजपा खासदार सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते अहमदनगरमध्ये माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

सुजय विखे म्हणाले, “आव्हान देणाऱ्यांच्या पिताश्रींनी मी विधान परिषदेचा राजीनामा देईन असंही जाहीर केलं होतं. अगोदर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा.”

“जनतेला त्या नेत्यावर आणि पक्षावर विश्वास राहिलेला नाही”

“जे पक्षश्रेष्ठी आहेत, महाराष्ट्राचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहिले, जे म्हणतात माझा शब्द अंतिम आहे त्यांनीच दिलेला राजीनाम्याचा शब्द पाळलेला नाही. जोपर्यंत ते त्यांचा शब्द पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांच्या पक्षाचा कोणताही पदाधिकारी काहीही बोलला तरी जनतेला त्या नेत्यावर आणि पक्षावर विश्वास राहिलेला नाही,” असंही सुजय विखेंनी म्हटलं.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं होतं. “मी माझ्या मतदारसंघातून राजीमाना देतो. माझ्याविरोधात निवडणूक लढवा. तुम्ही कसे निवडून येतात ते मी बघतो,” असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं होतं.

ते म्हणाले होते, “मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलेलं आहे. मी वरळीतून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. तुम्ही कसे निवडून येता ते मी बघतो. जी यंत्रणा लावायची आहे ती लावा. जी ताकद लावायची आहे ती लावा. जेवढे खोके वाटायचे आहेत तेवढे वाटा,” असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. तसेच एकही मत विकले जाणार नाही. मी त्यांना पाडणारच.”

हेही वाचा : Photos : “शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, कारण…”, संजय राऊतांचा मोठा दावा

आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “मुख्यमंत्री स्वत:ला क्रांतीकारी समजतात. ३२ वर्षांचा एक तरूण मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आव्हान स्वीकारावे. क्रांतीकारकाने कधीही घाबरायचे नसते,” असं संजय राऊत म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 12:56 IST