सोलापूर : संसदेत भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून केलेल्या कामगिरीचा ‘तमाशा’ असा उल्लेख करून अवमान केल्याच्या निषेधार्थ सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपने निदर्शने केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करीत, त्यांच्या प्रतिमेला काळे फासून जोड्याने मारण्यात आले.
संसदेत सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर चर्चा सुरू आहे. या चर्चेत भाग घेताना प्रणिती शिंदे यांनी भाग घेताना भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधातच्या माध्यमातून केलेल्या कामगिरीचा ‘तमाशा’ असा उल्लेख केला आहे. याविरुद्ध सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याच्याच निषेधार्थ भाजपने आज आंदोलन केले.
भाजपच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. या वेळी कोठे म्हणाले, ‘खासदार प्रणिती शिंदे यांनी केवळ राहुल गांधी यांची चापलुशी करून त्यांना खूश करण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. परंतु भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून केलेल्या अतुलनीय कामगिरीचे विस्मरण झाल्यामुळेच प्रणिती शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला उद्देशून कथित ‘तमाशा’ म्हटल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आमदार कोठे यांनी केला आहे. या वेळी आंदोलनात गाढवाचा वापर करत टीका करण्यात आली. आंदोलनात माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे आदी सहभागी झाले होते.