येत्या शनिवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी शिवजंयीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येणार असल्याचं राज्य शासनाने सोमवारी जारी केलेल्या नियमांमध्ये म्हटलंय. यासंबंधीच्या गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र यावरुन आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी टीका केली आहे. कालच ट्विटरवरुन यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर राम कदम यांनी व्हिडीओच्या माध्यमातून ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी शिवजयंती साजकी करताना आम्ही जुमाणणार नाही, असं म्हटलं आहे.
कालच नियम जाहीर झाल्यानंतर राम कदम यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधलेला. “शिवजयंती साजरी करण्यात ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही. अटी कसल्या टाकताय? हिंदूंचा उत्सव आला की लगेचच नियम? वा रे वा ! करायचे ते करा. शिवजयंती उत्सव आम्ही धूम धडाक्यात करणारच,” असं राम कदम म्हणाले होते.
राम कदम यांनी पुन्हा केली टीका…
आजही राम कदम यांनी ठाकरे सरकारवर या नियमांवरुन टीका केलीय. “हिंदूचे सण किंवा उत्सव आले की महाराष्ट्रातील ठाकरे सरकार खडबडून जागं होतं, जाचक अटी घालतं करोनाच्या नावाखाली. आता शिवजयंती आली. करोनासोबत कसं जगायचं, आमच्या जीवाची कशी काळजी घ्यायची
हे महाराष्ट्राच्या कड्या कपाऱ्यांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक शिवरायांच्या मावळ्याला माहितीय, शिवरायांच्या भक्ताला माहितीय, या तीन पक्षांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही,” असा टोला राम कदम यांनी लगावलाय.
महाराष्ट्राच्या जीवाची कशी काळजी घ्यायचीय ते…
तसेच पुढे बोलताना, “आता शिवजयंती साजरी करताना पण यांच्या जाचक अटी आहेत. ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी शिवजयंती साजरी करत असताना आम्ही जुममणार नाही. त्या जाचक अटी तुम्ही लगेच काढून टाका. महाराष्ट्राच्या जीवाची कशी काळजी घ्यायचीय ते प्रत्येक शिवप्रेमींना माहितीय. पण हे वारंवार जाचक अटी टाकण्याचं तुमचं सत्र सुरु आहे ते थांबवावं लागेल,” असंही राम कदम म्हणालेत.
काय निर्देश आहेत?
येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे आणि तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योत दौडीत २०० जणांना सहभागी होता येईल. तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्यात ५०० जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.