भाजपाने दिल्ली प्रदेश अध्यक्षपदी वीरेंद्र सचदेवा यांची नियुक्ती केली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर माजी अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. त्यानंतर सचदेवा कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत होते. मागच्या तीन महिन्यांत सचदेवा संघटनेच्या कामात चांगलेच सक्रिय दिसून आले. केजरीवाल सरकारच्या विरोधात त्यांनी अनेक आंदोलनेदेखील केली. फाळणीनंतर पंजाबी निर्वासित मोठ्या संख्येने दिल्लीत आले, सचदेवा या निर्वासितांपैकीच एक, जे पूर्वापार भाजपाला पाठिंबा देत आले आहेत. त्यामुळे पक्षाने जाणीवपूर्वक सचदेवा यांची निवड करून पुन्हा एकदा पंजाबी आणि बनिया समुदायांसोबत स्वतःला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मधल्या काळात हा वर्ग आम आदमी पक्षाकडे वळला. ५५ वर्षीय वीरेंद्र सचदेवा यांनी संघटनेच्या कामात आपल्या हुशारीची चुणूक वारंवार दाखवून दिली आहेच. त्याशिवाय त्यांनी आरएसएसच्या स्वयंसेवक वर्गातून प्रशिक्षण घेतलेले आहे. सचदेवा यांची निवड करून भाजपाने पुन्हा एकदा आपल्या जुन्या मतदारांकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. फाळणीनंतर मोठ्या संख्येने पंजाबी निर्वासित दिल्लीमध्ये थडकले होते. या पंजाबी जनतेला आपल्या बाजूला वळविण्यासाठी त्यांच्यातल्याच नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची खेळी भाजपाने खेळली आहे. हे वाचा >> विश्लेषण: दिल्ली महापौर पदाच्या निवडणुकीला इतकं महत्त्व का आहे? भाजपा आणि आपनं का केलाय प्रतिष्ठेचा मुद्दा? कोण आहेत वीरेंद्र सचदेवा? वीरेंद्र सचदेवा मागील तीन दशके भाजपात कार्यरत आहेत. माजी पत्रकार असलेल्या सचदेवा यांचे पालक पेशावरमधील होते. फाळणीनंतर भारतात आल्यावर सचदेवा यांचे बालपण चांदणी चौक येथे गेले. सचदेवा यांच्या कुटुंबाने दिल्लीत आल्यानंतर प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू केला. सचदेवा आपल्या संघटनकौशल्यासाठी ओळखले जातात. पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांची नावे आणि शहरे सचदेवांना माहीत असतात. २०१० पासून पंजाबी समुदायासोबतची आमची नाळ तुटली होती, ती सचदेवा यांच्यानिमित्ताने पुन्हा जुळली, असे भाजपाचे म्हणणे आहे. सचदेवा १९८९ पासून राजकारणात सक्रिय आहेत. आजवर पक्षात त्यांनी सचिव ते उपाध्यक्ष अशी अनेक पदे भूषविली आहेत. सध्या ते आपच्या विरोधात रणनीती आखण्यात पुढे आहेत. आपच्या १० भ्रष्टाचार प्रकरणांवर त्यांनी आवाज उठवला आहे. पंजाबी आणि बनिया हे भाजपाचे पूर्वापारपासून समर्थक होते. मात्र मधल्या काळात दोन्ही समुदायांच्या मतदानात फूट पडली. बनिया समुदायाची एक मोठी मतपेटी जी वर्षानुवर्षे आमच्यासोबत होती, ती आम आदमी पक्षाकडे वळली. आपकडून मोफत वीज किंवा पाणी मिळत असल्यामुळे हा समुदाय त्यांच्याकडे गेलेला नाही, तर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे बनिया समुदायातील असल्यामुळे हा वर्ग त्यांच्याकडे गेला, असे एका भाजपा नेत्याने सांगितले. दिल्लीमध्ये जातसमूह हा निवडणुकीच्या मतदानावेळी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच सचदेवा यांची निवड केल्यामुळे आम्हाला व्यापारी वर्गाचा पुन्हा एकदा पाठिंबा मिळू शकेल. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे करून व्यापारी आणि पंजाबी समुदायाचाही पाठिंबा मिळवता येऊ शकेल, अशी अटकळ आणखी एका भाजपा नेत्याने व्यक्त केली. हे ही वाचा >> ‘भाजपाने फक्त कचऱ्याचे ढिगारे दिले, पराभव मान्य करा,’ दिल्ली महापौर निवडणुकीवरून मनिष सिसोदियांची भाजपावर टीका सचदेवा यांच्या नियुक्तीबाबत एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, सचदेवा कार्याध्यक्ष असतानाच दिल्लीतील पंजाबी निर्वासितांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले होते. आज तर निर्वासितांचा आनंद द्विगुणित झाला असेल. सचदेवा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, केजरीवाल सरकारचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू. हेच आमचे धोरण आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री हे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध प्रतिक्रिया देत असतात, त्याचाही त्यांना जाब विचारला जाईल, असेही सचदेवा या वेळी म्हणाले.