महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजपा आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. यानंतर राज्यातील राजकारण आरोप-प्रत्यारोपाने ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय हा शरद पवारांनी केला”, असा निशाणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी झाली आहे. आता त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनाही हे माहिती आहे की, या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत. मागील निवडणुकीवेळी त्यांचे १८ खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते. मात्र, शरद पवार आणि काँग्रेसबरोबर जाऊन उद्धव ठाकरे यांनी आपला जनाधार संपवला. आता १८ खासदारांचा नंबर उद्धव ठाकरेंकडे दिसणार नाही. त्यामुळे त्यांना भिती वाटू लागली आहे. निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता जनतेला जे अपेक्षित नाही ते उद्धव ठाकरे करत आहेत”, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

शेतकऱ्यांना मजबूत करण्यासाठी मोदींची गॅरंटी

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. मात्र, शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या पिकाला कधीही हमीभाव मिळाला नाही, शेतकऱ्यांना कधीही वेळेवर खते, वेळेवर वीज मिळत नव्हती. शरद पवार कृषीमंत्री असताना आपला महाराष्ट्र कृषी क्षेत्रात १० व्या क्रमांकावर गेला होता. मात्र, आता शेतकऱ्यांच्या पाठिशी पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे उभे आहेत. शरद पवार आता शेतकऱ्यांच्या गोष्टी करत आहेत, आपण कृषीमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ पाहिला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय कोणी केला असेल तर शरद पवार यांनी केला. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांबाबत आता पुळका दाखवू नये, शेतकऱ्यांना मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे”, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना लगावला.