”राज्यात, देशात यापुढे होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत भाजपाचा विजय होणार आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक दुरंगी होवो की बहुरंगी भाजपाचा उमेदवार निवडून येणार हे नक्की. पाच राज्यातील निवडणुकीत मतदारांनी काँग्रेससह विरोधकांना नाकारून भाजपाला स्वीकारले आहे. त्याचीच पुनरावृत्ती या पोटनिवडणुकीत होईल.”, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) कोल्हापूरमध्ये व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ”देशातील कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असल्याचा प्रत्यय मतदारांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत दाखवून दिला आहे. पोटनिवडणुकीसाठी पक्षाने घेतलेल्या मुलाखतीतून सत्यजित कदम व महेश जाधव ही दोन नावे केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. सत्यजित कदम यांच्या नावाला प्राधान्य राहील.”, असे म्हणत त्यांनी कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले.

जयश्री जाधवा यांनी भाजपाकडून लढावे –

कोल्हापूरची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा काही नेत्यांनी सुरू केली असली तरी त्यात तथ्य नाही, असा उल्लेख करून चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”राज्यात अशी परंपरा आहे की कोणा आमदारांचे निधन झाले की त्यांच्या घराण्याला सर्वांनी मदत करावी. जयश्री जाधव तसेच त्यांचे दीर संभाजी जाधव हे भाजपाचे आमदार होते. त्यामुळे जयश्री जाधव यांनी भाजपाकडून ही निवडणूक लढवावी आणि दोन्ही काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा; तरच निवडणूक बिनविरोध होऊ शकते.”

बिनविरोधची चर्चा; पण… –

पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. जयश्री जाधव यांना भाजपाने पाठींबा द्यावा असा प्रस्ताव घेवून पालकमंत्री सतेज पाटील मला भेटले होते. भाजपाने निवडणूक कमळ चिन्हावर निश्चितपणे लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे आपण त्यांना सांगितले, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

राजू शेट्टींचे स्वागतच केले जाईल –

महाविकास आघाडीच्या कारभाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे कंटाळले आहेत. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते आघाडी पासून फारकत घेण्याची चिन्हे आहेत. त्यांनी पुन्हा भाजपाला पाठिंबा दिला तर भाजपाची कोणती भूमिका राहील? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांचे स्वागतच केले जाईल, असे उत्तर दिले.

तर आज कोल्हापुरात भाजपाची बैठक झाल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी राजू शेट्टी यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची जयसिंगपूर येथे भेट घेतली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर ,भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आदींचा समावेश होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will win in any future election in the state in the country chandrakant patil msr
First published on: 18-03-2022 at 19:37 IST