पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाने नेहमीच भाजपला साथ दिली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत कमळाचे चिन्ह नसतानाही महायुतीमधील राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराने या मतदारसंघातून ६५ हजारांचे मताधिक्य घेतले होते. या मतदारसंघातून यावेळी किमान एक लाख मताधिक्य अपेक्षित आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘बारामती’ लोकसभा निवडणुकीच्या विजयात खडकवासला विधानसभा मतदारसंघावर भिस्त असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी हे संकेत देतानाच त्यांचे एकेकाळचे राजकीय विरोधक आणि सध्याच्या मित्रांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी येथून मोठे मताधिक्य मिळेल. बारामती विधानसभा मतदारसंघातून किती मताधिक्य मिळेल, ते बारामतीकरच ठरवतील, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – अजित पवारांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान : म्हणाले, “राहुल गांधींचे ‘खटाखट’, तर माझे ‘कचाकचा’…”

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या काही नेत्यांची नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे पुरंदर, इंदापूर, दौंडसह सर्वच भागांतून मताधिक्य मिळणार आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील, पुरंदरचे शिवसेनेचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे, दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. महायुतीला पोषक वातावरण आहे. नाराजी दूर करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील ‘शब्द’ पाळला जाईल, असे सांगत विरोधक आणि मित्र कसा असावा, हे विजय शिवतारे यांनी दाखवून दिले आहे, असे पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी या विधानसभा मतदारसंघातून निश्चितच मताधिक्य मिळेल. मात्र यावेळी खडकवासल्यातून किमान लाखांचे मताधिक्य अपेक्षित आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघ शहरी भागात येतो. या मतदारसंघाने भाजपला सातत्याने साथ दिली आहे. गेल्या काही निवडणुकीतूनही ही बाब स्पष्ट झाली आहे. महायुतीचा उमेदवार असल्याने ही मते निश्चित मिळतील. दहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून ६५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यावेळी ‘घड्याळा’ला मत म्हणजे मोदींना मत हे घरोघरी पोहोचवावे लागेल.

महायुतीच्या प्रचारप्रमुखांची यादी जाहीर

बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची गुरुवारी घोषणा केली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आणि किरण गुजर या तिघांचा समावेश असून, ही समिती पूर्ण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचारप्रमुखपदी बारामतीत बाळासाहेब तावरे, इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये आमदार राहुल कुल, पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे, खडकवासल्यामध्ये आमदार भीमराव तापकीर, भोर-वेल्हा-मुळशीमध्ये कुलदीप कोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखांचे कर्ज; अजित पवार, प्रतिभा पवारांनाही कर्जपुरवठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामतीच्या विकासात अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. कोणी कितीही हल्ला केला तर मी विचलीत होणार नाही. विकासाचा मुद्दा घेऊनच जनतेपुढे जाणार आहे. बारामतीची विकास प्रक्रिया पुढेही गतिमान केली जाईल. – सुनेत्रा पवार, उमेदवार, महायुती