राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंना पराभवाची धूळ
मुंडे बहीण-भावाची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या लोकसभा निवडणुकीत अखेर भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना तब्बल पावणेदोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभवाची धूळ चारली. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात निवडणूक जातीवादावर गेल्याने चुरस निर्माण झाल्याचे चित्र उभे राहिले होते. मात्र, मतदारांनी भाजपच्या विकासात्मक धोरणाला साथ दिल्याचे स्पष्ट झाले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रा. विष्णू जाधव यांनीही पाऊण लाखापर्यंत मतदान घेतले आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षाही जास्त मतांनी प्रीतम मुंडे यांनी विजय मिळवत नवा विक्रम स्थापन केला. विधानसभेच्या सर्व मतदारसंघातून मताधिक्य घेत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना धोबीपछाड दिली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी बाजार समितीच्या सभागृहात सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आघाडी घेतली. सायंकाळी सहापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्या पेक्षा एक लाख ७७ हजार मते घेऊन निर्णायक आघाडी घेतली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विष्णू जाधव यांनीही पाऊण लाख मते घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच फटका बसला. विधानसभेच्या सहाही मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेच्या आष्टी मतदारसंघातून तब्बल ७० हजारांचे, गेवराईतूनही ३५ हजारांचे तर माजलगावमधून २० हजारांचे मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या केज मतदारसंघातूनही भाजपला २८ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. पालकमंत्री पंकजा मुंडे प्रतिनिधित्व करत असलेल्या परळी मतदारसंघातूनही जवळपास २० हजारांचे मताधिक्य मिळाल्याने आपले वर्चस्व कायम ठेवण्यात भाजपच्या सर्वच आमदारांनी यश मिळवले आहे.
कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे यश
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा जिल्हा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून टोकाचा प्रचार झाला तरी सामान्य जनतेने भाजपच्या विकासाला साथ दिली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे नियोजन आणि राजकीय धूर्तपणा तर पक्षाच्या कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे या निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळाले. जनतेने विकासाला साथ देऊन जातीवादी प्रचाराला मूठमाती दिली.
– डॉ. प्रीतम मुंडे, खासदार