Mumbai High Court on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २७ ऑगस्टपासून आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणासाठी बसले आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी हजारो मराठा आंदोलक राज्याच्या अनेक भागातून मुंबईत आले. चार दिवसांत मुंबईतील अनेक भागात आंदोलकांनी रास्ता रोको केल्याचे प्रकार घडले. तसेच आंदोलनाला दिलेल्या परवानगीचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. यानंतर आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने यासंबंधी सुनावणी घेतली. उद्या दुपारी ४ पर्यंत आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर सर्व परिसर मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधी मनोज जरांगे पाटील यांचे वकील श्रीराम पिंगळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली.
उच्च न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर वकील श्रीराम पिंगळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, २७ ऑगस्टपासून झालेला घटनाक्रम लक्षात घ्यावा लागेल. पहिल्याच दिवशी आंदोलकांना पाणी, जेवण आणि शौचालय अशा मुलभूत प्रश्नांपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून आंदोलकांकडून काही बाबी झाल्या.
मराठा आंदोलक आरोपी नाहीत
वकील श्रीराम पिंगळे पुढे म्हणाले, “ज्या दिवशी आंदोलन सुरू झाले, त्याची कल्पना सरकारलाही होती. देवेन भारती यांच्याबरोबर यासंबंधी बैठकही झाली होती. तरीही आंदोलकांना मुलभूत मानवीय गरजा पुरविल्या गेल्या नाहीत. मराठा आंदोलक हे आरोपी नाहीत. याआधी सात ते आठ वेळा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले आहे. जर आधीच आरक्षणाची मागणी पूर्ण केली असती तर आज मुंबईत येण्याची गरजच भासली नसती.”
आंदोलनात घुसखोर
वकील श्रीराम पिंगळे पुढे म्हणाले, “आंदोलनात काही जणांनी घुसखोरी केली असून ते हुल्लडबाजी करत आहेत. त्यांच्या वाईट गोष्टी न्यायालयात दाखविण्यात आल्या. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला निघाल्यापासूनच सर्वांना याबाबत माहिती दिली होती. न्यायालय आणि प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात यावे, असे त्यांनी आंदोलकांना बजावले होते. आंतरवाली ते मुंबई आणि मुंबईत आल्यानंतरही त्यांनी कायदा व सुव्यवस्था पाळण्यासंबंधी आवाहन केले होते.”
माध्यमात किंवा इतर ठिकाणी वाईट गोष्टी दाखवल्या जात आहेत. चांगल्या बाबी दाखवल्या गेल्या नाहीत, याबाबत वकील श्रीराम पिंगळे यांनी नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाने आजवर कुणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाही. उलट इतरांचे हक्क प्रस्थापित केले आहेत. राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड यांचे प्रमुख उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
आंदोलनात घुसलेले समाजकंटक आंदोलन भरकविटण्याचे काम करत आहेत. उच्च न्यायालयाने पाच हजार आंदोलकांना थांबण्यास सांगून इतर जागा मोकळ्या करण्यास सांगितल्या आहेत, असेही ते म्हणाले.