सांगली : ‘हर घर तिरंगा’ या प्रमाणे मोदी सरकारने ‘हर घर संविधान’ हा उप्रकमही राबवावा, असे मत कम्युनिस्ट नेत्या माजी राज्यसभा सदस्या कॉ. वृंदा करात यांनी व्यक्त केले. विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठातर्फे कॉ. करात यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी जेष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, डॉ. विश्वास सायनाकर, आ. अरुण लाड, महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदींची उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी कॉ. करात यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी त्या म्हणाल्या, भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तिरंग्याचे तीन रंग मान्य नाहीत. त्यांना केवळ भगवा रंगच आपला वाटत आला आहे. तरीही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने का होईना त्यांना तिरंगा महत्त्वाचा वाटला हे बरे झाले. ‘हर घर तिरंगा’ या प्रमाणे ‘हर घर संविधान’ हा उपक्रमही भाजपने राबवावा असे आवाहनही त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडी, सीबीआय, आयटी या संस्था आता अन्य पक्षातील लोकांना भाजपमध्ये आणण्यासाठी अस्त्रासारख्या भाजपकडून वापरल्या जात आहेत. केंद्रीय संस्थांचा वापर पक्ष वाढविण्यासाठी सुरू आहे. देशात ३ हजार ७०० जणांवर ईडीने कारवाई केली, मात्र, यापैकी केवळ २३ दोषी आढळले. विरोधकामध्ये ऐक्य नसल्याने देशात मोदींना पर्याय नसल्याचे सांगितले जात असले तरी राजकारण प्रवाही असते हे लक्षात घ्यायला हवे. २०२४ च्या निवडणुकीत निश्चितपणे मोदींना पर्याय उपलब्ध होईल, असा विश्वासही कॉ. करात यांनी या वेळी व्यक्त केला.