Budget Session 2025 : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होणार आहे. ३ मार्च ते २१ मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. तसेच १० मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा सुरु होईल. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा होणार आहे. तसेच त्यानंतर पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत.

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आलं. त्यामुळे या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळणाऱ्या घोषणा होतात का? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, महायुती सरकारचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळपास तीन आठवडे चालणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या काही घोषणा होणार का? याची शेतकऱ्यांना अपेक्षा लागली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सोयाबीन आणि कापूस दरवाढ, सोयाबीन आणि कापूस खरेदीबाबत काही ठोस निर्णय होईल का? तसेच पीक विमा या मुद्यांवर सरकार काही घोषणा करणार का? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडक्या बहि‍णींचा हप्ता वाढणार?

विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये त्यांच्या खात्यावर देण्यात येतात. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती. मात्र, अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत काही घोषणा करण्यात येणार का? याकडे लाडक्या बहि‍णींचं लक्ष लागलं आहे.