बुलढाणा शहर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या ६७ हजार ४७० आहे. वाढती लोकसंख्या आणि शहराचा वाढता विस्तार पाहता शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा व हे शहर मॉडेल शहर म्हणून विकसित व्हावे, या दृष्टिकोनातून संपूर्ण शहराचा र्सवकष शहर विकास आराखडा एएनजे पॉवर टेक्नॉलॉजीस प्रा.लि. बडोदरा या कंपनीकडून तयार करून घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत या शहराचा समावेश करावा, अशी मागणी नगराध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांनी निवेदनाद्वारे गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्याकडे केली आहे.
केंद्र शासनाकडून देशात १०० शहरांचा र्सवकष विकास करून स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या दोन दिवसात या योजनेसाठी शहरांची निवड केली जाणाऱ्याची शक्यता आहे. बुलढाणा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून पर्यटन, अध्यात्मिक, सांस्कृतिक व भौगोलिकदृष्टय़ा या शहराचे वेगळे महत्व आहे. सद्यस्थितीत शहराचा र्सवकष विकास आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे मंजुरीसाठी सादरही करण्यात आला आहे. त्यामुळे बुलढाणा शहराचा १०० स्मार्ट सिटी योजनेत समावेश करावा, अशी मागणी नगराध्यक्ष अंभोरे व उपमुख्याधिकारी श्रीपाद देशपांडे यांनी रणजित पाटील यांच्याकडे केली आहे.
बुलढाणा नगर परिषदेने हे व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना शहराचे आगामी ५० वर्षांत होणारे शहरीकरण व शहरातील विद्यमान समस्यांचा सखोल अभ्यास करून शहरासाठी दीर्घकालीन उपाययोजना म्हणून वैविध्यपूर्ण विकास या योजना प्रस्तावित केली आहे. त्याचा प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांच्या समक्ष २२ जानेवारीला सादरीकरणही करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी र्सवकष विकास आराखडय़ात शहराच्या दीर्घकालीन गरजांच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. या सूचनांनुसार आराखडय़ात आवश्यक ते बदल केलेत. विकास आराखडय़ाचे अवलोकन केल्यानंतर हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान करणेबाबत शासनास शिफारसही केली आहे. तसेच या विकास आराखडय़ाला शासनाची मंजुरी मिळण्यासाठी आयुक्तांकडेही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता बुलढाणा शहराचा केंद्राच्या १०० स्मार्ट सिटी योजनेत समावेश करावा, अशी आग्रही मागणी नगराध्यक्षांनी केली आहे.