वसमत येथील आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या निवासस्थानातून विद्युत मीटरमधून ‘बायपास’ वीजपुरवठा दिल्याने वीजवितरण कंपनीने त्यांना १४ हजार रुपयांचा दंड लावला. हा राग मनात धरून आमदार डॉ. मुंदडा यांच्या पुतण्यासह चौघांनी कनिष्ठ अभियंता संजय मुंढे यांना मारहाण केली. यात त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीबद्दलची तक्रार त्यांनी वसमत पोलीस ठाण्यात दिल्यानंतर रात्री उशिरा याबाबतचा गुन्हा दाखल झाला. आमदार डॉ. मुंदडा यांच्या घरातील वीजमीटर त्यांच्या पत्नी रितादेवी यांच्या नावे आहे.
वसमत शहरातील अनधिकृत वीज जोडण्याची तपासणी मोहीम सुरू असताना कनिष्ठ अभियंता संजय मुंढे यांना रितादेवी जयप्रकाश मुंदडा यांच्या नावावरील ग्राहक क्र. ५४५०१००७५०९९ या मीटरमधून ‘बायपास’ वीजपुरवठा देण्यात आल्याचे लक्षात आले. मुंढे यांनी तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास दिला. नियमानुसार वीज कंपनीने आमदार मुंदडा यांना १४ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारणावरून डॉ. मुंदडा यांचे पुतणे दीपक मुंदडा व इतर कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी ११.३० वाजता उपविभागीय कार्यालयात जाऊन अभियंत्याची कॉलर धरली. आमदार साहेबांना तू दंड लावतोस का असे म्हणत अभियंत्याच्या कानशिलात भडकावली. त्यांना लागलेला मार एवढा जबर होता की, अभियंत्याच्या कानातील पडदा फाटला असल्याचे सांगितले गेले. ऐकू येत नसल्याची तक्रार वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर मार किती जबर आहे, हे तपासल्यानंतरच कळेल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात दीपक मुंदडा यांच्यासमवेत काशीनाथ भोसले, बंटी मोबाईल शॉपीवाला व राहुल राठोड आदीजण कार्यालयात घुसल्याची तक्रार अभियंता मुंढे यांनी केली.
झालेला प्रकार लक्षात आल्यानंतर विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार देऊ नये यासाठी नेत्यांनी अप्रत्यक्ष दबाव आणल्याची चर्चा वसमत शहरात होती. कर्मचाऱ्यांनी अभियंता मुंढे यांना धीर दिल्याने त्यांनी दीपक मुंदडा यांसह अन्य तिघांविरोधात त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.