शहरातील रेल्वे परिसराजवळील समता नगर येथे करोना रूग्ण आढळून आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला करोनाची लागण होऊ नये म्हणून मोहीम सुरू करण्यात आली आहे. लाल चर्चपासून ते पीओएच भागापर्यंत आणि उत्तर कॉलनी कंडारीचा भाग ‘कॅन्टोन्मेंट झोन’ जाहीर करण्यात आला आहे.

रेल्वेचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी एक मोहीम सुरू केली गेली आहे. त्या अंतर्गत कल्याण निरीक्षक मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य, अन्न आणि निरोगीपणासाठी दररोज संपर्क साधला जातो. विभागातील सर्व रेल्वे वसाहतीत आवश्यक माहितीची भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. रोगप्रतिकार शक्तीस चालना देण्यासाठी जीवनसत्वयुक्त गोळ्यांचे वाटपही करण्यात आले आहे. भुसावळच्या ‘झेडआरटीआय’ मध्ये शंभर खाटांचे विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. डीसीएचसी-कोविड हेल्थ केअर सेंटर, मंडल रेल हॉस्पिटल येथे ६४ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ.अखिलेश कश्यप, सहाय्यक कार्मिक अधिकारी वीरेंद्र वडनेरे आणि सहाय्यक विभागीय यांत्रिकी अभियंता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली जात आहे.

भुसावळ रेल्वे यांत्रिकी विभागातर्फे घरच्या घरी मास्क तयार करण्यात येत आहेत. विभागातील कर्मचारी लघुलेखक ज्योती शितोळे यांनी आपल्या निवासस्थानी स्वखर्चाने आतापर्यंत दीड हजार मास्क तयार केले असून एक हजार २०० मास्क रेल्वे कर्मचारी आणि उर्वरित मास्क गरजू लोकांना देण्यात आले आहेत.