सातारा : बंदी गातलेली असतानाही सातारा जिल्ह्यात शहर आणि वाई परिसरात ‘आवाजाच्या भिंती’ लावून गणेश मिरवणुका काढल्याबद्दल संबंधित मंडळांच्या ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त करण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली.

डबेवाडी (ता. सातारा) येथे दोन गणेशोत्सव मंडळांनी ‘आवाजाच्या भिंती’ लावून वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टरचालक व संबंधित ध्वनिक्षेपक यंत्रणेचे मालक यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून संबंधित यंत्रणा जप्त करण्यात आली आहे. वाई येथे बावधन नाका रस्त्यावर शिवाजीनगर ते सोनगीर वाडी रस्त्यावर कर्णकर्कश आवाजात यंत्रणेचा वापर केल्याने दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईच्या माध्यमातून ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या मालकांना सातारा पोलिसांनी संदेश दिला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेक्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सुरू होत्या. डबेवाडी येथे दोन गणेशोत्सव मंडळांनी ‘आवाजाच्या भिंतीं’ लावून मर्यादेपेक्षा जास्त आवाजात मिरवणुका काढल्या. यामुळे सातारा-सज्जनगड रस्त्यावर वाहतूक कोंडी केल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जाऊन तेथे पाहणी केली असता संबंधित तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले. पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या सूचनेप्रमाणे संबंधित मंडळाचे अध्यक्ष, मालक व ट्रॅक्टरचालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत पोलीस हवालदार राजू शिखरे, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, दादा स्वामी, किरण निकम, प्रदीप मोहिते, संदीप पांडव, शंकर गायकवाड यांनी भाग घेतला होता.

पोलिसांचा इशारा

सातारा शहरासह जिल्ह्यात नियमभंग केलेल्या ‘आवाजाच्या भिंती’ आणि तीव्र प्रकाशझोत चालकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनेक मंडळांकडून ‘आवाजाच्या भिंती’ (डॉल्बी), तीव्र प्रकाशझोतचा (लेझर लाईट) वापर केला जातो. याबाबत शासनाने नियमावली जाहीर केली आहे. या अंतर्गत काही व्यावसायिकांनी शिस्तीत काम करणे सुरू केले आहे. तरीही सातारकरांच्या डोळ्यांचा त्रास वाढू लागला आहे. यावर पोलिसांनी आवाजाच्या भिंती आणि तीव्र प्रकाशझोत यंत्रणेच्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

साताऱ्यात गणेशोत्सवाच्या आनंदाला उधान आले आहे. तीव्र प्रकाशझोत आणि आवाजाच्या भिंतींनी काही ठिकाणी मर्यादांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याविषयी प्रशासनाने गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये आवाजाच्या भिंतींचा व तीव्र प्रकाशझोतचा त्रास झाल्यास कोणालाही सोडले जाणार नसत्याचा इशारा दिला आहे.

साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आवाजाच्या भिंती आणि तीव्र प्रकाशझोत असणाऱ्या वाहनांवर बंदीची मागणी केली आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी भर पावसात मोर्चाही काढला होता. त्याचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे. पोलीस कारवाई करत असताना दुसरीकडे नागरिक भर पावसात या यंत्रणेला विरोध करताना दिसत आहेत. त्यासाठी आंदोलन करत आहेत. जर कोणीही आवाजाचे आणि तीव्र प्रकाशझोतांच्या यंत्रणेने नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे.