मुंबई : केंद्र व राज्य सरकारमधील तणावपूर्ण संबंधांमुळेच बहुधा मावळते मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा राज्याचा प्रस्ताव केंद्राने मान्य केला नाही. कुंटे हे निवृत्त झाल्याने देबाशीष चक्रवर्ती यांच्याकडे मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपिवण्यात आला तर कुंटे यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.

कुंटे हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. अर्थसंकल्प, नैसर्गिक आपत्ती, रोगराई या मुद्दय़ांवर मुख्य सचिवांना साधारणपणे मुदतवाढ दिली जाते. गेल्या वर्षी अजोय मेहता यांना करोनामुळे मुदतवाढ देण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्यावरील खंडणीवसुलीच्या आरोपांवरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय(ईडी) कुंटे यांना चौकशीसाठी नोटीस बजाविली होती. या नोटिशीला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यातच केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील संबंधही ताणले गेले आहेत. सीबीआयची नोटीस आणि केंद्र व राज्यातील ताणल्या गेलेल्या संबंधांतून कुंटे यांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली नसावी, असा अंदाज मंत्रालयात व्यक्त केला जात आहे.

कुंटे यांना मुदतवाढ मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर राज्य सरकारने सायंकाळी अतिरिक्त मुख्य सचिव (नियोजन) देबाशीष चक्रवर्ती यांच्याकडे मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सुपूर्द केला. यानुसार सायंकाळी चक्रवर्ती यांनी कुंटे यांच्याकडून पदभार स्वीकारला. चक्रवर्ती यांच्याकडेच पूर्णवेळ मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपविली जाईल, असे सांगण्यात येते. वास्तविक १९८५च्या तुकडीतील शामलाल गोयल आणि वंदना कृष्ण हे दोन अधिकारी सेवाज्येष्ठ असूनही महाविकास आघाडी सरकारने १९८६च्या तुकडीतील चक्रवर्ती यांच्याकडे मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपविला. यापैकी गोयल हे डिसेंबरअखेर तर वंदना कृष्ण या चक्रवर्ती यांच्याबरोबरच फेब्रुवारीअखेर सेवानिवृत्त होतील.

कुंटे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार

मुख्य सचिवपदी मुदतवाढ मिळाली नसली तरी कुंटे यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार या पदावर नियुक्ती करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. तत्पूर्वी यूपीएस मदान व अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदावरून निवृत्तीनंतर मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अहवालाची प्रतीक्षा

नवी मुंबई: सचिन वाझे आणि परमबीर सिह यांच्या झालेल्या भेटी वेळी उपस्थित नवी मुंबई पोलिसांच्या चार कर्मचाऱ्यांच्या बाबतचा अहवाल अद्याप नवी मुंबई पोलिसांना मिळालेला नाही.  गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंग हे सोमवारी निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समोर हजर झाले होते तर याच वेळी सचिन वाझे आणि त्यांची झालेल्या भेटीची चर्चा होती. या बाबत वाझेला घेऊन आलेल्या पोलीस पथकाची चौकशी करण्यात आली होती . या बाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिह यांनी  काहीही माहिती नसल्याचे सांगितले.