शरद पवार यांचे प्रतिपादन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : सहकाराबाबतचे कायदे राज्याच्या विधानसभेत केलेले आहेत. त्यामध्ये केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. केंद्र सरकारच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मांडली. घटनेनुसार सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारितील आहे, असेही पवार म्हणाले.

केंद्र सरकारने सहकार खात्याची निर्मिती करून अमित शहा यांच्याकडे हे पद दिल्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर गंडांतर येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत तथ्य नसल्याचे पवार यांनी बारामतीतील गोविंदबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पवार म्हणाले, की मल्टिस्टेट बँका हा केंद्राचा विषय आहे. त्यामुळे केंद्राचे सहकार मंत्रालय हा नवीन विषय नाही. दहा वर्षे मी कृषी खाते सांभाळत असतानाही हा विषय होता.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील, हा आमचा तीनही पक्षांचा स्वच्छ निर्णय झाला आहे. त्यावर आम्ही कायम  असल्याने कोणी काही बोलण्याचा संबंध नाही, असे पवार यांनी सांगितले. समान नागरी कायद्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. सरकार काय करतेय यावर आमचे लक्ष आहे, असे पवार म्हणाले.

आम्ही तीन पक्ष नव्हे तर सरकार एकविचाराने चालविण्यावर आम्ही ठाम आहोत. त्यामध्ये कोणताही वाद नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने याबाबत काही भूमिका घेतली असेल तर त्यामध्ये वावगे काही नाही. त्यामुळे याविषयी गैरसमज असण्याचे कारण नाही. सरकार एकविचाराने चालले आहे की नाही हे महत्त्वाचे आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

‘नाना पटोले लहान माणूस..’ माझा फोन टॅप करून त्याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिली जात असून, सोबत राहून पाठीत खंजीर खुपसला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी लोणावळ्यात केला होता. शरद पवारांवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यावर, ‘नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही. सोनिया गांधी काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो. ती लहान माणसं आहेत. त्यांच्यावर मी कशाला बोलू’, असा टोला पवार यांनी या वेळी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centre s intervention in co operation law impossible statement by sharad pawar zws
First published on: 12-07-2021 at 03:31 IST