वर्धा : वर्धा जिल्ह्य़ात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक फेररचना केली आहे. या फेररचनेचा लाभ कुणाला मिळणार, अशा बदलांमुळे भाजपला टक्कर देण्यास हे पक्ष समर्थ ठरतील काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चारच वर्षांपूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असा लौकिक ठेवणाऱ्या वर्धा जिल्हय़ात ‘कमळ’ची शेती गावोगावी बहरली. याच काळात काँग्रेस मात्र खिळखिळी व्हायला लागली. पक्षांतर्गत सुंदोपसुंदी व ठरावीक नेत्यांच्या मनसबदारीने राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवणारा नवा वर्ग भाजपकडे वळला.  ‘अच्छे दिन’ हा शब्द भाजपसाठी वर्धा जिल्हय़ात सार्थ ठरला. त्यामुळे काँग्रेसचे यापुढे काय, असाही प्रश्न विचारला जाऊ लागला.

या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडय़ाभरात काँग्रेस व राकाँच्या जिल्हा संघटनेत बदल करण्यात आले आहेत. काँग्रेसने शहराध्यक्षपदी सुधीर पांगुळ हा राकाँचा ‘माजी’ चेहरा आणला. पालिका निवडणुकीत इतरांना मागे टाकून भाजपशी अपक्ष लढणाऱ्या पांगुळांनी याआधी अनेकांना बेजार केले आहे. वर्धा शहर काँग्रेस समिती व जिल्हा समिती यापूर्वी दोन टोकांवर होत्या. पांगुळांच्या नियुक्तीने आता काँग्रेसमध्ये एकाच गटाचे म्हणजे आमदार रणजीत कांबळे गटाचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हय़ात प्रभाराव – प्रमोद शेंडे अशा दोन गटांत पूर्वी जुगलबंदी चाले. मग मेघे – कांबळे असे वाद रंगले. आता कांबळे एके कांबळे, असेच पाढे वाचले जातील. कांबळेविरोधक म्हणून ओळख असणाऱ्या शेखर शेंडेंचे काय, हा त्यामुळेच निर्माण झालेला दुसरा प्रश्न. आर्वी मतदारसंघातील आमदार अमर काळे यांचे वर्चस्व मात्र कायम आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी वर्धा दौऱ्यात पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रदेशाध्यक्षांच्याही सभेला किंमत न देणारे पदाधिकारी पाहून ते संतापले. बदलाचे वारे वाहिले. संजय कामनापुरे, राहुल घोडे, संजय तपासे हे चेहरे पुढे आले. पक्षाचे सर्वेसर्वा माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांचे उत्तराधिकारी असलेले समीर देशमुख यांनी पक्ष वाढवण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत स्वीकारली. या पक्षातही काँग्रेसप्रमाणेच दुसरा एकच गट आहे. हिंगणघाटात राजू तिमांडे, सुधीर कोठारी यांचे वर्चस्व पक्षाने मान्य केले. कांबळेंना आर्वी वगळता व प्रा. देशमुख यांना हिंगणघाट वगळता आव्हान नाही. वर्धा मतदारसंघावर प्रामुख्याने भिस्त ठेवून राकाँची निवडणुकीकडे वाटचाल सुरू आहे. भाजपचे आव्हान असणाऱ्या काँग्रेस आघाडीचे नेतृत्व आमदार रणजीत कांबळे व अमर काळे तसेच राकाँचे प्रा. देशमुख व तिमांडे यांच्याकडे आले आहे. काँग्रेसचे दोन विद्यमान व राकाँचे दोन माजी आमदार भाजपचा विजयरथ रोखण्यास समर्थ आहेत का, याचे उत्तर राजकीय वर्तुळात शोधले जात आहे.

काँग्रेसतर्फे  महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांना लोकसभेची उमेदवारी गृहीत धरली जात आहे. पक्षात कांबळे – टोकस यांचे राजकारण न मानणारे आहेतच. ते टोकस यांच्याविरोधात काही नावे समोर आणतात का, हा एक प्रश्न आहे. मुळात आघाडीचे नेतृत्व भाजपच्या एकमुखी सामूहिक नेतृत्वास टक्कर देण्यासाठी अद्यापही सिद्ध झालेले नाही. कुणबी – तेली अशा न मिटल्या जाणाऱ्या वादात भाजप-काँग्रेसचे राजकारण रंगले आहे. या राजकीय लढाईत अपेक्षित विकासकामांचा मुद्दा मात्र मागेच पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चारच वर्षांपूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असा लौकिक ठेवणाऱ्या वर्धा जिल्हय़ात ‘कमळ’ची शेती गावोगावी बहरली. याच काळात काँग्रेस मात्र खिळखिळी व्हायला लागली. पक्षांतर्गत सुंदोपसुंदी व ठरावीक नेत्यांच्या मनसबदारीने राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवणारा नवा वर्ग भाजपकडे वळला. त्यातच असंतुष्ट काँग्रेस नेत्यांनी थेट भाजपप्रवेश करीत नवी राजकीय वाटचाल सुरू केली.