पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे भीमा नदीला येणारे पुराचे संकट टळले आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेले १ लाख क्युसेक पाणी येथील नदीत पोहचले आहे. त्यामुळे येथील भीमा अर्थात चंद्रभागा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे. वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. भाविकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

पुणे जिल्हा आणि धरण लाभक्षेत्र येथील पावसाने भीमा नदीला पुराचे संकट आले होते. उजनी आणि वीर धरणातून १ लाख क्युसेक पाणी भीमा नदीला सोडण्यात आले होते. मात्र, मंगळवारी सकाळपासून धरणाचा विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला. उजनी धरणातून सकाळी ७५ हजार त्यानंतर कमी करत दुपारी ५ वाजत ५५ हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे. तर वीर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. सायंकाळी ६ वाजता वीर धरणातून नीरा नदीत ७८३७ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे अकलूज येथील संगम येथे भीमा नदीला जाऊन मिसळते. पुढे हे पाणी भीमा अर्थात चंद्रभागा नदीला जाऊन मिसळते. हे दोन्ही पाणी मंगळवारी येथील चंद्रभागा नदीला मिसळले. त्यामुळे चंद्रभागा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे.

यंदाच्या पावसाळी हंगामात पाचव्यांदा भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. येथील वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. घाटाला पाणी लागले आहे. दुपारी भीमा नदीत ८८१५७ क्युसेक पाणी वाहत होते. तर पाण्याची पातळी ४४२ मीटर होती. भीमा नदीची इशारा पातळी ४४३ तर धोक्याची पातळी ४४५ मीटर आहे. सध्या तरी पुराचे संकट टळले आहे. मात्र, येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्यने येतात.

दर्शनाधी चंद्रभागा नदीचे स्नान केले जाते. मात्र, सध्या पाण्याची पातळी वाढत आहे. आणि वाहते पाणी असल्याने भाविकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, सर्व घाट आणि नदी परिसरात दिवाबत्तीची व्यवस्था केली आहे. तसेच नदी पात्रात जाऊ नये याच्या सूचना देखील दिल्या जात आहेत. असे असले तरी चंद्रभागा नदी सहाव्यांदा वाहत असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला असल्याचे समाधान स्थानिक नागरिकांना आहे.