कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर शहरात दे धक्का द्यायला सुरुवात केल्यानंतर आता मित्रपक्षांनी प्राथमिक चाचपणी करायला सुरुवात केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये लक्ष घातले आहे. त्यांनी कोल्हापुरातील माजी नगरसेवकांच्या भेटी घेतल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे आज मंत्री पाटील यांनी आगामी पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरातील नगरसेवकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी निवडणुकी संदर्भात संवाद साधला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, प्रा. जयंत पाटील, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे यांची उपस्थिती होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३३ जागांसह महापौरपदावर दावा

भाजपाने महानगरपालिका निवडणुकीत मागील वेळच्या विजयी ३३ जागांवर आग्रही राहातानाच अन्य ठिकाणी सक्षम उमेदवार असणाऱ्या प्रभागात महायुतीकडून आणखीन जागा मागून घेऊन कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच करण्याचा निर्धार करण्यात आला. प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे महानगरपालिकेत देखील सत्ता आल्यास कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.