केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादातूनही पंकजा मुंडे यांची नाराजी दिसून आली. पंकजा मुंडे यांनी राज्यातील पक्षांच्या नेत्यांचा उल्लेख करणंही टाळलं. त्यातच भाजपाने बोलावलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीकडे पंकजा मुंडे गैरहजर होत्या. त्यांच्या अनुपस्थितीनंतर आज चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे पंकजा यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न तर नव्हता ना? अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- देवेंद्र फडणवीसांचं नाव का घेतलं नाही?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचाही समावेश केला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रीतम मुंडे यांचा समावेश केला गेला नसल्याचं समोर आल्यानंतर मुंडे समर्थकांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत राजीनामे नामंजूर केले. तसेच मोदी-शाह-नड्डा हेच आपले नेते असल्याचं सांगत राज्यातील नेतृत्वावरील नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा- मोदी, शाह, नड्डा माझे नेते… धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत; पंकजा मुंडे कडाडल्या

त्यानंतर भाजपाच्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीलाही पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या. अचानक २० जूनला सायंकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. वरळी येथील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या कार्यालयात ही भेट झाली. त्यामुळे भाजपाकडून पंकजा यांची मनधरणी केली जात असल्याची चर्चा सुरू झाली. या भेटीनंतर पाटील यांनीही भाष्य केलं होतं. “एका पक्षातील दोन नेत्यांची भेट होणं यात वेगळं असं काही नाही. ही भेट गुप्त नाही तर उघडपणे सर्वांसमोर झाली. त्यामुळे या भेटीचे फोटो कालपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आम्ही दोघे भेटलो यात बातमी काय?”, असं पाटील भेटीनंतर म्हणाले.

माझे नेते राष्ट्रीय स्तरावरच…

पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मोदी-शाह-नड्डा हेच आपले नेते असल्याचं म्हटलं होतं. “माझ्याविषयी मागील दोन तीन दिवसात जी विधान केली गेली ती मी लिहून ठेवली आहेत. त्यामध्ये भाजपातील कोणत्याही नेत्याने नकारात्मक भाष्य केलेलं नाही. पण काही नेत्यांनी असं विधानं केली की पक्षाने काय दिलं, हे पंकजा मुंडेंनी लक्षात ठेवावं आणि ते विधान त्या नेत्यांकडून वारंवार केलं गेलं. माझं इतकंच म्हणणं आहे की पक्षाने मला जे दिलंय ते मी लक्षात ठेवेन, पण मलाच दिलं नाही. अनेकांना दिलंय. मग सतत का बोलून दाखवलं जातं”, असं पंकजा म्हणाल्या होत्या. त्यावर आपण मोदी, शाह, नड्डा यांचं नाव घेतलं, मग देवेंद्र फडणवीसांचं का नाही घेतलं? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. “मी राष्ट्रीय स्तरावर काम करते आहे. महाराष्ट्रात पक्षाच्या कोणत्याच पदावर नाही. माझे नेते राष्ट्रीय स्तरावरच आहेत”, असं पंकजांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil met pankaja munde maharashtra politics pankaja munde latest news bmh
First published on: 22-07-2021 at 09:52 IST