सांगली : आम्ही तुमच्या मुलासारखे आहोत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान, तुम्ही पालकमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुण्याची जबाबदारी सांभाळा अशी मिश्किल विनंती खासदार विशाल पाटील यांना करताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाल्य केवळ निधीपुरतेच असते. राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही असे उत्तर दिले.

जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींना यांत्रिक बोटींचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. पलूस तालुक्यातील औदुंबर येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी चोपडेवाडी, संतगांव (राडेवाडी), बुर्ली, दह्यारी, तुपारी, नागठाणे, सुखवाडी व अंकलखोप या गावांसाठी प्राप्त फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी राजकीय नेत्यांची जुगलबंदी हास्य मिळवणारी ठरली.

खा. पाटील म्हणाले, आम्ही जरी वेगळ्या पक्षाचे असलो तरी आम्हाला तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळावे. आता जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादाना मात्र एक विनंती आहे की, तुम्ही आता सांगलीच्या पालकमंत्री पदाचा चार पाच महिने राजीनामा द्यावा. पुण्याची तात्पुरती जबाबदारी घ्यावी, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या की पुन्हा सांगलीचे पालकमंत्री घ्या. कारण मागच्या निवडणुकांमध्ये आम्हाला तुम्ही पालकमंत्री असल्याने मोठा फटका बसला होता. भले निवडणुका झाल्यावर पुन्हा पालकमंत्री स्वीकारा.

आमदार डॉ. कदम म्हणाले, विशाल आणि मी तुमच्यासाठी लहान मुलासारखे आहोत, तुम्ही आमचे पालक आहात, खासदार विशाल पाटील म्हणाले आम्हाला सांभाळा, याचा माध्यमांनी वेगळा अर्थ घेऊ नये. विकासनिधींच्या बाबतीत पालकमंत्री आमच्याबाबत दुजाभाव करत नाही, त्यांचे आमच्यावर मुलासारखे प्रेम राहावे.

खा. पाटील व आ. कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पाल्य म्हणून निधी मागायचा आणि दुसऱ्याच दिवशी नाव लावायचे. पाल्य केवळ निधीपुरताच असतो. मात्र, सध्याचे राजकारण फारच प्रवाही आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. याचे उदाहरण देताना सांगितले, २०१९ मध्ये निवडणुका झाल्यावर युतीचे १६१ आमदार निवडून आले होते. २९ अपक्ष आमदार बॅगा भरून तयारच होते. मात्र, उध्दव ठाकरे यांनी आम्ही तुमच्यासोबत येणार नाही असे सांगितले. यानंतर सांगलीहून परतत असताना देवेंद्र फडणवीस यांचा दूरध्वनी आला. तत्काळ मुंबईला निघण्यास सांगितले, दर दोन तासांनी कुठेपर्यंत आलात याची विचारणा होत होती. आणि अखेर ऐतिहासिक पहाटेचा शपथविधी राजभवनावर पार पडला.

पालकमंत्री म्हणाले, राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, नुकसान भरपाईसाठी ४१ हजार कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त शासनाकडून अजूनही उपाययोजना सुरू आहेत. भविष्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, गटविकास अधिकारी राजेश कदम, महेंद्र लाड, सम्राट महाडिक, राजाराम गरूड विविध गावचे सरपंच उपस्थित होते.

यावेळी वासुदेव जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक घनश्याम सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. आभार सचिन पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास औदुंबर, अंकलखोप व परिसरातील गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.