scorecardresearch

“पुड्या सोडण्याची जयंत पाटील यांना सवय”; माजी आमदारांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत पाटलांचा टोला

सांगलीत पण काही दिवसात इनकमिंग झालेले दिसेल, असे जयंत पाटील म्हणाले होते.

Chandrakant Patil reaction to former MLA entry into NCP

सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी कोणाचा प्रवेश होणार आहे याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. यावरुन आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे.

पक्षात प्रवेश होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसेल असं म्हणताना, “राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. प्रत्येक गुरुवारी मुंबईl मोठ्या संख्येने नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत, सांगलीत पण काही दिवसात इनकमिंग झालेले दिसेल,” असे जयंत पाटील म्हणाले होते.

 त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अशा पुड्या सोडण्याची जयंत पाटील यांना सवयच आहे. असा कार्यकर्ता जाणार असेल तर राजकारणात चढउतार असतातच. त्यांचे कार्यकर्ते आम्ही पक्षात घेतले त्याची संख्या छोटी नाही,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

दरम्यान, सांगली जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना जोरदार धक्का बसला आहे. रोहित पाटील यांचा राजकीय मंचावर झालेला दणदणीत प्रवेश आणि कडेगावमध्ये राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना बसलेला पराभवाचा धक्का प्रस्थापितांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. विश्वजीत कदम यांच्या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले. “काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपाचा पराभव करणं शक्य होतं. आकडेवारी तेच दाखवत आहे. अशी त्रुटी राहणार नाही पुढच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना काळजी घेईल,” असे जयंत पाटील म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक शिवसेनेला जमले नाही

“मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर कोणीही टीका केली नाही. प्रत्येक वेळी त्यांची तब्येत बरी व्हावी यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली. मात्र आम्ही मुख्यमंत्री पद सोडण्यास सांगितले नाही तर पदाचा चार्ज दुसऱ्या नेत्याला देण्यास सांगतले होते. संजय राऊतांना यामध्ये चिमटा बसण्यासारखे काय होते माहिती नाही. बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक शिवसेनेला जमले नाही त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काम केले आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrakant patil reaction to former mla entry into ncp abn