scorecardresearch

“संजय राऊतांनी माझी केलेली सगळी चेष्टा अंगावर येणार आहे”; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीवरुन मी जे म्हणत आहे ते सगळं खरे ठरत चाललं आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil warning on Yashwant Jadhav case

शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या चौकशीत प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एक डायरी सापडली असून त्यात संशयास्पद व्यवहार समोर आले आहेत. या डायरीत दोन व्यवहार आढळून आल्याने संशय निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘मातोश्री’ला ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि दोन कोटी रुपयांचे आणखी एक गिफ्ट देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी ते चुकीचे ठरवत डायरीत आईसाठी लिहिल्याचे सांगितले आहे. यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांचा उल्लेख करत या प्रकणावरुन प्रतिक्रिया दिली आहे. “अशी डायरी सापडली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही. पण मला एवढंच दिसत आहे की खूप काही तरी होणार आहे. वारंवार संजय राऊत यांच्याकडून माझी चेष्टा केली जाते. पण सगळी चेष्टा अंगावर येणार आहे कारण मी जे म्हणत आहे ते सगळं खरे ठरत चाललं आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

या संदर्भात यशवंत जाधव यांना प्रश्न विचारला असता, पहिल्या नोंदीमध्ये ५० लाखांच्या घड्याळांचे त्यांनी आईच्या वाढदिवसानिमित्त वाटप केले होते, असे सांगितले. याशिवाय आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी गुढीपाडव्याला गरजूंना दोन कोटी रुपयांच्या वस्तू वाटप केल्याचं सांगितलं. या भेटवस्तू वाटपासाठी आपण मातोश्री लिहिल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांच्यासमोर दोन कोटी रुपयांची नोंद करण्यात आली. २५ फेब्रुवारीला प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ही डायरी सापडली होती. यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या बॅग भरून ठेवल्या आहेत

किरीट सोमय्या हे शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी दापोली येथे दाखल झाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या बॅग भरून ठेवल्या आहेत कारण कोणाचा नंबर लागेल माहिती नाही. किरीट सोमय्या त्यांच्या कर्दनकाळ ठरलेले आहेत,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सामना वाचणे बंद केले आहे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या पंतप्रधान मोदींच्या झोपेच्या विधानावरून त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. तसेच, ही चमचेगिरी असल्याचं म्हणत त्यावर टीका देखील केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. सामना वाचणे आणि संजय राऊतांवर बोलणे मी बंद केले आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrakant patil warning on yashwant jadhav case abn

ताज्या बातम्या