भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपला उरलेला पक्ष शोधत आहेत, असं टीकास्र बावनकुळे यांनी सोडलं.
बावनकुळे यांनी तासगात येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करणाऱ्यांना लोकांना घरी बसावं लागलं. बेईमानीचा बदला काळच घेतो. उद्धव ठाकरे शिवसेना कुठं गेली, हे शोधत आहेत. तर, पक्ष कुठं-कुठं राहिला, यासाठी शरद पवार दिल्लीत बैठका घेत आहेत. पण, किंचित राहिलेला पक्ष संपवून टाकण्याचं काम तासगावमधून करायचं आहे.”
हेही वाचा : “शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणात फरक हाच की…”, जयंत पाटलांचं विधान
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून शरद पवारांनी कटकारस्थानं रचली. देवेंद्र फडणवीस अष्टपैलू नेते आहेत. फडणवीसांनी कधीही स्वत:साठी नाहीतर समाजासाठी काम केलं,” असं बावनकुळेंनी सांगितलं आहे.
“महायुतीत भाजपाच मोठा भाऊ आहे. कुटुंब आणि आघाडीत मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणं, ही पूर्वीपासून भाजपाची भूमिका आहे, त्यात काहीच वावगं नाही,” असं मतही बावनकुळेंनी व्यक्त केलं.
हेही वाचा : ‘या माणसानं देशाचं वाटोळं केलं’, जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टनंतर अण्णा हजारे आक्रमक; दिला ‘हा’ इशारा
“सरकारमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींची कामे आता होत आहेत. लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. असे झाले तर १४-१५ मंत्री वाढतील आणि पालकमंत्री देखील वाढतील, सरकारी कामे व योजनांना गती मिळेल,” असं बावनकुळेंनी सांगितलं.