scorecardresearch

“प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे त्यांना…” चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला शेलक्या शब्दात समाचार

चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकाश आंबेडकरांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका

Chandrashekhar Bawankule and Prakash Ambedkar
जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी?

प्रकाश आंबेडकर हे लहान डोक्याचे आहेत. त्यांच्याविषयी काय बोलावं? असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज भाजपा आणि संघाविषयी एक वक्तव्य केलं होतं त्याबाबत विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या खास शैलीत हा समाचार घेतला आहे. भाजपाने आणि संघाने मनुस्मृती सोडावी तसं केलं तर आम्ही त्यांच्यासोबतही जाण्यास तयार आहोत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्याबाबत प्रश्न विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेलक्या शब्दात प्रकाश आंबेडकरांचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले आहेत चंद्रशेखर बावनकुळे?

उद्धव ठाकरेंची किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र झाली आहे. पण या दोघांचं एकत्र येणं महाविकास आघाडीला मान्य नाही. कितीही वंचित आणि किंचीत सेना एक झाली तरीही आम्हाला अडचण नाही. शिंदे-फडणवीस सरकारलाही काही अडचण नाही. महाविकास आघाडीलाही आम्ही टक्कर देऊ शकतो. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी जे मनुस्मृतीविषयी जे वक्तव्य केलं कारण ते इतक्या लहान डोक्याचे आहेत.भाजपा हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं शासन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. तसं भाजपामध्ये सर्वाधिक आदिवासी आणि मागास वर्गांचे कार्यकर्ते आहेत. हे त्यांना कळत नसेल तर काय बोलणार असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलं होतं?

आजच्या घडीला कुठलाही पक्ष कुठल्या पक्षाचा शत्रू नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. आमचे आणि आरएसएस, भाजपाचे टोकाचे मतभेद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपा असो ते आजही मनुस्मृती मानतात. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं ते मोहन भागवतांनी करावं

एका पत्रकार परिषदेत मला विचारण्यात आलं होतं की काय कृती केली म्हणजे तुम्ही म्हणाल की भाजपाने आणि संघाने मनुस्मृती सोडली. मी त्यांना उत्तर दिलं की जे बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये केलं ते जर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये करावं तर आम्ही मान्य करू. मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही. मनुस्मृती हा सामाजिक आणि राजकीय व्यवस्था सांगणारा ग्रंथ आहे. त्यामध्ये RSS आणि भाजपा बदल करणार असेल जो बदल सरदार पटेल यांनी जुलै १९४९ मध्ये केला होता तो त्यांनी मनाने स्वीकारावा. ते बदलणार असतील तर ते आमचे शत्रू नाहीत. राजकीय समझौता कधीही होऊ शकतो. असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. या बाबत प्रश्न विचारला असता बावनकुळे यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 14:18 IST