Chandrashekhar Bawankule on Mobile phones Under Surveillance : “सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असं खळबळजनक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (२३ ऑक्टोबर) भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यक्रमात केलं होतं. “कार्यकर्त्यांचे मोबाईल व भंडाऱ्यातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असं ते म्हणाले होते. मंत्री बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्या अटकेची मागणी केली आहे. यावर आता महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी माध्यमांशी बोलताना केली आहे. राऊत म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर इंडियन टेलिग्राफ ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करून चौकशी करा. बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅसिसचं मशीन स्वत: आणलंय का? की भाजपाच्या कार्यालयात लावलंय? किंवा त्यासाठी काही खासगी लोक कामाला लावलेत का?”

“योजना व त्यांच्या कामांवर आम्ही लक्ष ठेवतो”

यावर स्पष्टीकरण देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मी काल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते वक्तव्य केलं. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली कामं, त्यांनी केलेल्या टिप्पण्या, व्हॉट्सअ‍ॅपवरील प्रतिक्रिया या गोष्टी आमच्या वॉर रूममधून तपासल्या जातात. निवडणूक काळात, पक्षाच्या कार्यात प्रत्येकजण योगदान देत असतो. यावेळी पक्षाने जी काही कामं सांगितली आहेत त्यावर लक्ष असतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी या योजना आणल्या, केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच्या ज्या योजना आल्या त्या सर्व आम्ही मॉनिटर करतो (लक्ष ठेवतो).”

संजय राऊतांना प्रत्युत्तर

संजय राऊतांनी केलेल्या अटकेच्या मागणीवर बावनकुळे म्हणाले, “आमचा पक्ष आम्ही कसा चालवावा हे सागणारे संजय राऊत कोण? त्यांना का मिरची झोंबली? आमच्या पक्षात कार्यकर्त्यांबरोबर रोज संवाद साधला जातो. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होते, म्हणून मी तसं वक्तव्य केलं.”