राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही राष्ट्रसेवा, समाजाची सेवा आणि राष्ट्र निर्माण यासाठी कार्य करणारी देशातील प्रमुख संस्था आहे. या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे लोक मूर्ख आणि राष्ट्रद्रोही आहेत, अशी जोरदार टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भंडारा या ठिकाणी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात राष्ट्रभावना निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत संघाची विचारधारा प्रतिबिंबित होते. त्यामुळे जो कोणी संघावर बंदी घालण्याचा विचार करतो, तो खरं तर राष्ट्रद्रोही आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आजवर एकाही सरकारने ३२ हजार कोटींचं पॅकेज दिलं नाही-बावनकुळे

बावनकुळे यांनी एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या विचाराला राष्ट्रद्रोह म्हटलं. तर दुसरीकडे महायुती सरकारचं शेतकरीपक्षीय धोरण आणि विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत सरकारच्या भूमिकेचं ठाम समर्थन केलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं नव्हतं. हे पॅकेज शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरणार असून रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवल उभं करण्यास मदत करेल. आम्ही शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान भरून काढू असं म्हणत नाही, पण हे पॅकेज शेतकऱ्यांना नव्याने उभं राहण्याची ताकद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाना पटोले यांनाही दिलं प्रत्युत्तर

नाना पटोले यांनी ‘शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली’ असा आरोप केला होता,.त्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्र सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत. विरोधक फक्त टीका करतात, पण त्यावरील उपाय दाखवत नाहीत.”

मतचोरीच्या आरोपांबाबत काय म्हणाले बावनकुळे?

विरोधकांकडून वारंवार मत चोरीच्या आरोपांवरही बावनकुळे यांनी पलटवार केला. ते म्हणाले, “नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे इतर नेते खासगीत पराभव मान्य करतात. पण कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी ते लोक मत चोरीचे आरोप करतात. आता जनता महायुतीच्या मागे उभी आहे, त्यामुळे विरोधकांना आपला पक्ष आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी अशा खोट्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो.” संजय राऊत यांच्या टीकेवर मिश्किल शैलीत प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “कोण संजय राऊत? त्यांना उठल्यावर दिवसभर फटाके फोडायचे असतात. दीपावलीचा दिवस आहे, म्हणून फार सिरीयस होऊ नका. आम्हाला विकासाच्या राजकारणात भंडारा जिल्ह्याला पुढे न्यायचं आहे, बाकी फटाके फोडण्याचं काम त्यांच्यावर सोडा.”